सांगली,
Send Your Name to the Moon campaign सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान लाभला आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASA यांच्या महत्त्वाकांक्षी Artemis II मोहिमेशी या शाळेचे नाते जोडले गेले असून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर येथील विद्यार्थी आणि शिक्षकांची नावे झळकणार आहेत.
नासाने ‘Send Your Name to the Moon’ या संकल्पनेअंतर्गत जगभरातील नागरिकांना व्हर्च्युअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत वाटेगाव जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी केली. त्यानंतर नासाकडून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अधिकृत ‘बोर्डिंग पास’ पाठविण्यात आले. मंगळवारी शाळेत या बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या नावांची नोंद नासाच्या अधिकृत पोर्टलवर करण्यात आली असून ती नावे विशेष एसडी कार्डद्वारे अंतराळयानात समाविष्ट केली जाणार आहेत.आर्टेमिस-२ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडा येथील Kennedy Space Center वरून प्रक्षेपित होणार आहे. या मोहिमेत अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत सुमारे ६ लाख ८५ हजार मैलांचा प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. या ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना व्हर्च्युअली पाहता येणार आहे.
या उपक्रमासाठी शिक्षक विकास Send Your Name to the Moon campaign पाटील, पद्मश्री राजाराम राजमाने, प्रसाद हसबनीस आणि विद्या पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना लहान वयातच अंतराळ संशोधन, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अंतराळवीरांचे जीवन यांची माहिती व्हावी, त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन व मोठी स्वप्ने रुजावीत, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे शिक्षक प्रसाद हसबनीस यांनी सांगितले. मुख्याध्यापक विकास पाटील यांनीही नासाच्या व्हिडिओंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळातील गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणाविषयी माहिती दिली असल्याचे नमूद केले.या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, विस्तार अधिकारी छायादेवी माळी आणि केंद्रप्रमुख वसंत शिंगारे यांनी शाळेचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील शाळेने थेट आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेशी जोडले जाणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.