रोहित शर्मासोबत ‘हास्यजत्रा’ कलाकारांची खास भेट

मराठीतल्या संवादाने चाहत्यांचा उत्साह दुणावला

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Rohit Sharma प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांना नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असते. त्यांच्या नाटकांचे प्रयोग असोत किंवा सार्वजनिक कार्यक्रम, चाहत्यांची गर्दी त्यांच्यासोबत फोटो आणि संवाद साधण्यासाठी उत्सुक असते. मात्र यावेळी या कलाकारांनाच एक खास ‘फॅन मोमेंट’ अनुभवण्याची संधी मिळाली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातील कलाकारांना लाभला आणि ही भेट त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरली.
 

Rohit Sharma, Maharashtrachi Hasyajatra, 
हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर यांच्यासह अभिनेत्री भक्ती देसाई आणि भाग्यश्री मिलिंद यांनी रोहितची भेट घेतली. ही भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय देसाई, किशोर लाड आणि वर्षा हडकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. काही क्षणांची ही भेट असली तरी तिची आठवण कलाकारांच्या मनात कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
 
या भेटीदरम्यान रोहित Rohit Sharma शर्माने सर्वांशी मराठीत संवाद साधत उपस्थितांना सुखद धक्का दिला. नम्रता संभेराव यांनी उत्साहाने त्याला विचारले, “कसे आहात तुम्ही?” त्यावर रोहितने हसत “मज्जेत” असे उत्तर दिले. नम्रता यांनी पुढे सांगितले की, त्यांनी रोहितचे मराठीत बोलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. त्यावर रोहितने सहजपणे, “मी मुंबईत राहतो, त्यामुळे मराठी येणारच,” असे उत्तर दिले. त्याच्या या साध्या आणि मनमोकळ्या उत्तराने उपस्थित सर्वजण भारावून गेले.या खास भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. भक्ती देसाई आणि नम्रता संभेराव यांनी हे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. रोहितला भेटण्यापूर्वीची कलाकारांची उत्सुकता आणि त्याच्यासमोर आल्यानंतरचा आनंद कॅमेऱ्यात सुंदरपणे टिपला गेला आहे. अमराठी असूनही रोहितने सहज मराठीत संवाद साधल्याने कलाकारांसह चाहत्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.सोशल मीडियावर या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहित शर्मा आणि हास्यजत्रेच्या कलाकारांची ही अनोखी भेट क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील दोन लोकप्रिय विश्वांना एकत्र आणणारी ठरली आहे. रोहितचा मराठी अंदाज आणि कलाकारांचा उत्साह यामुळे ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.