महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या : चाकणकर

* जनसुनावणीत महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही * चंद्रपुरात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
rupali-chakankar ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी, जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारी मार्गी लावल्या. त्यासाठी 5 पॅनलचे गठन करण्यात आले होते. यात वैवाहिक, कौटुंबिक समस्यांच्या 79, सामाजिक समस्यांच्या 5, मालमत्ता, आर्थिक फसवणुकीच्या 6, कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणार्‍या लैंगिक छळाबाबत 1 व इतर 4, अशा एकूण 95 तक्रारींवर कार्यवाही झाली. महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या, असे निर्देश चाकणकर यांनी प्रशासनाला दिले.
 

rupali-chakankar 
 
नियोजन भवन येथे पार पडलेल्या या जनसुनावणीला रुपाली चाकणकर यांच्यासह सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, महिलांच्या तक्रारी जागच्या जागेवर सुटाव्या, त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. rupali-chakankar अनेक महिला, त्यांच्या समस्यांबाबत तक्रारी करतात, मात्र यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे.
 
महिलांना आपल्या समस्यांबाबत मुंबईत चकरा माराव्या लागू नये, स्थानिक स्तरावरच त्यांच्या तक्रारींची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने महिला आयोगच तुमच्या दारी आला आहे. भरोसा सेल, दामिनी पथकाच्या माध्यमातून पोलिस विभाग चांगले काम करीत आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आयोगाकडे येतात. मात्र हा वाद होऊच नये, यासाठी विवाहापूर्वीच तरुण मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. rupali-chakankar हुंडाबळी कायदा अस्तित्वात असूनही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातो. हुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेत. आपल्या कर्तुत्वावर मुलींचे लग्न करा. त्यासाठी मुलींना चांगले शिकवा. बालविवाहाबाबतही पालकांनी सजग राहावे, असे आवाहन चाकणकर यांनी केले. प्रास्ताविक मिनाक्षी भस्मे यांनी केले. संचालन राणी खडसे यांनी, तर आभार मोरेश्वर झोडे यांनी मानले.