पुण्यात एकाच पोलिस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदली

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
पुणे,
32 police personnel transferred in Pune पुणे पोलिस दलात आयुक्त अमितेश कुमार यांनी आतापर्यंत केलेली सर्वात मोठी कारवाई म्हणून लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. यामध्ये ३ सहायक पोलिस फौजदार, १० पोलीस हवालदार आणि १९ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. माहितीनुसार, या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्या गेल्या असल्या तरी, काही कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामागे आणखी इतर महत्त्वाची कारणे असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कार्यकाळ संपवूनही तिथेच राहणारे, पोलिस ठाण्याजवळ राहणारे आणि कर्तव्यात कमी पडलेले कर्मचारी आहेत.
 
 
 
pune
लोणी काळभोर पोलिस ठाणे पूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत होते. ५ वर्षांपूर्वी ते पुणे शहर आयुक्तालयात आले, परंतु तेव्हापासून येथे अनेक कर्मचाऱ्यांची बदली झाली नव्हती. शहर आयुक्तालयात आल्यापासून या ठिकाणच्या अनेक कर्मचाऱ्यांची तिथून जवळच्या इतर पोलिस ठाण्यातही बदली झाली नव्हती. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ ६ चे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांसह वरिष्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यानंतर अखेर हा निर्णय घेण्यात आला. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी हजर राहून कार्यालयात अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आता नवीन कर्मचारी कार्यरत होणार आहेत, तर जुन्या कर्मचाऱ्यांवरून नवीन व्यवस्थापनाची सुरुवात झाली आहे. पुणे शहर पोलिस दलात ही एक ऐतिहासिक आणि मोठी प्रशासकीय कारवाई म्हणून पाहिली जात आहे.