bai gangabai जिल्ह्यातील मातृत्व सेवांबाबत दिलासादायक चित्र समोर आले असून विविध करणांनी नेहमी चर्चेत राहणार्या शहरातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय प्रशासनाचे गेल्या एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांत तब्बल ४ हजार २१८ महिलांची सुरक्षित प्रसूती पार पाडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि सक्षम वैद्यकीय पथकामुळे आई-बाळाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही सेवा अखंड सुरू आहे. एकूण प्रसूतींपैकी १,९९५ प्रसूती नैसर्गिक (नॉर्मल) पद्धतीने तर २,२२३ प्रसूती सिझेरियनद्वारे करण्यात आल्या. वैद्यकीय गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांनी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे गुंतागुंतीच्या प्रसंगातही सुरक्षित मातृत्वाची हमी देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांसह मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील महिला देखील प्रसूतीसाठी येथे येत आहेत. यावरून रुग्णालयावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली असून प्रशिक्षित मनुष्यबळ व आधुनिक उपकरणांमुळे सेवा अधिक सक्षम झाली आहे. रुग्णालयात ५०० खाटांची सुविधा उपलब्ध असून दररोज सरासरी २५ ते ३० प्रसूती येथे पार पडतात. वाढती रुग्णसंख्या असूनही डॉक्टर व परिचारिका कर्मचारी तत्परतेने सेवा देत आहेत.bai gangabai जिल्ह्यातील मातृत्व सेवांचा केंद्रबिंदू ठरलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाने सुरक्षित प्रसूतींच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आनंद दिला असून ‘सुरक्षित आई - निरोगी बाळ’ या ध्येयाकडे भक्कम वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.