‘इस्रो’च्या दौऱ्यावरून परतलेल्या ४४ बालवैज्ञानिकांचा नागपुरात गौरव

19 Feb 2026 20:58:07
नागपूर, 
isro tour वर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) आणि जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकारातून ‘इस्रो’ची शैक्षणिक सफर करून परतलेल्या ४४ बालवैज्ञानिकांचा नागपूर येथील हॉटेल प्राईडमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक आहेत. भविष्यात हेच विद्यार्थी इसरोआणि नासामध्ये संशोधक म्हणून कार्यरत दिसतील,” असा विश्वास व्यक्त केला.
 

isro  
 
कार्यक्रमात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विज्ञानाच्या जिज्ञासू वृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान दडलेले असते. केवळ पाठांतर न करता त्यामागील कारणांचा शोध घेण्याची सवयच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल,” असे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, आयआयएम नागपूरचे डॉ. शिवाजी धावड, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे तसेच डायट वर्धाचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तक देण्यात आले.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञानाची जागतिक ओळख व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून या ऐतिहासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बंगलोर येथील ‘ इस्रो’ आणि कुप्पममधील ‘अगस्त्या फाउंडेशन’ येथे विद्यार्थ्यांनी उपग्रह तंत्रज्ञान व विविध वैज्ञानिक प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. भविष्यात आपणही वैज्ञानिक बनून काहीतरी वेगळे काम करू असा आत्मविश्वास या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.isro tour विद्यार्थ्यांसाठी हा एक मनोरंजक प्रवास होता. इस्रोच्या दौऱ्यानंतर त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहे.
-प्रा. डॉ. सीमा पुसदकर, डायट, वर्धा
---------------------
या भेटीदरम्यान पुस्तकी विज्ञान व्यतिरिक्त विज्ञानाचा उपयोग किती वेगळ्या स्तरावर करता येते हे प्रत्यक्षात आम्हाला पाहायला मिळाले. पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असल्याने तोही एक वेगळाच अनुभव होता. मी पुन्हा इस्रोला केवळ भेट म्हणून नव्हे तर एक शास्त्रज्ञ म्हणून जाईन.
- कृतिका मुळे, समुद्रपूर येथील वर्ग ८वी ची विद्यार्थिनी
----------------------
इस्रोसोबत लालबाग, विश्वसर आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या क्रिएटिव्ह कॅम्पसला भेट देत विविध भौतिक प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. या अनुभवांनी केवळ वैज्ञानिक ज्ञान वाढवले नाही, तर चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना दिली.
- अभिनव शुक्ला, सक्षम शाळा, वर्धा येथील वर्ग ८वी चा विद्यार्थी
Powered By Sangraha 9.0