बंधन बँक अन् महिंद्रा कोटकचा ‘केमिकल लोचा’!

19 Feb 2026 18:41:48
सेलू, 
bandhan bank कर्ज घेताना प्रोसेसिंग शुल्क आणि विम्याचे पैसे कपात करण्यात बँका अजिबात वेळ घालवत नाहीत. मात्र, लाभार्थ्याला खर्‍या अर्थाने मदत करण्याची वेळ आली की, कागदोपत्री प्रक्रियेच्या नावाखाली वारसदारांना अक्षरशः बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशीच एक संतापजनक बाब सेलू येथे समोर आली आहे.
 
 
 
बंधन बँक
 
सेलू येथील मेघा बडे यांनी स्थानिक बंधन बँकेच्या शाखेतून वर्षभरापूर्वी ६५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. सदर कर्ज मंजूर करताना बँकेने प्रोसेसिंग शुल्क, विम्याचा हप्ता देखील कपात केला. त्यांचा कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून एक लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. मेघा बडे यांनी दर महिन्याला नियमितपणे १३ हफ्ते भरले. मात्र, अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर चित्रच बदलले. आज त्यांच्या मृत्यूला तब्बल ११ महिने उलटले तरीही त्यांच्या वारसदाराला विम्याचा लाभ मिळालेला नाही, ही एक शोकांतिकाच आहे.
 
विम्याची रकम प्राप्त करण्यासाठी प्रथम वारसदाराचे बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे यावेळी बँकेकडून सांगण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला तब्बल १० महिने लागले. या काळात वारसदाराने कागदपत्रांची पूर्तता, वारंवार फेर्‍या आणि अधिकार्‍यांशी पाठपुरावा करत अक्षरशः दमछाक सोसली.bandhan bank खाते उघडल्यानंतर उर्वरित कर्जरकमेच्या परतफेडी संदर्भात वारसदाराकडून लेखी अर्जही घेण्यात आला. त्या प्रक्रियेलाही दीड महिना लोटला. तरीदेखील विम्याची रकम अद्याप वारसदाराच्या खात्यात जमा झालेली नाही. या प्रकरणात नेमका अडथळा कुठे आहे, याबाबत स्पष्टता नाही. बँक प्रशासन आणि विमा कंपनी यांच्यातील समन्वयाचा अभाव की प्रशासकीय ढिलाई? याचे उत्तर कोण देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
कर्ज मंजुरीच्या वेळी तत्परता दाखवणार्‍या बँका आणि विमा कंपन्या, लाभ देताना मात्र का ढेप खातात? त्यांच्यात केमिकल लोचा नेमका कुठे आहे, हे समजत नसल्याने वारसदार गेल्या ११ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

मृत व्यती हा बँकेचा नियमित खातेदार आहे आणि त्याने प्रामाणिकपणे हफ्ते देखील भरले. विम्याचे पैसेही वेळेवर कपात झाले. मग लाभ मिळवण्यासाठी इतकी पायपीट का? असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून वारसदाराला विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

आमच्या बँकेची सगळी प्रोसेस झाली आहे. आता इन्शुरन्स कंपनीचा विषय आहे. विम्याचा लाभ नेमका कधी मिळणार हे सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रीया बंधन बँकेचे क्षेत्र व्यवस्थापक यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0