जिनिंग प्रेसिंगचे गाळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात !

19 Feb 2026 11:58:29
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Umrakhad construction controversy, संस्थेच्या बांधकाम सल्लागार अभियंत्याने दुकान गाळे बांधकामाचे दर सांगितले असताना त्यापेक्षा जास्त दराने ठेकेदाराला बांधकाम देऊन संस्थेचे 40 लाखांचे नुकसान होत आहे. ही निविदा देताना संचालकांना विश्वासात अथवा बैठक न घेता अध्यक्ष व उपाध्यक्षांनी निविदा फोडून ठेकेदाराला जास्त दराने काम दिले.
 

Umrakhad construction controversy,  
संचालकांसमोर ठराव न ठेवता सर्वानुमते ठराव मंजूर असल्याचे कार्यवृत्तात दाखवण्यात आले. या सर्व प्रकाराची सहायक निबंधकांकडे तक्रार केली असून हे सुरू असलेले बांधकाम थांबवावे अन्यथा आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा मानद सचिवासह आठ संचालकांनी पत्रपरिषदेद्वारे दिला.
सहकार क्षेत्रात नावाजलेले सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने यांनी स्थापन केलेल्या भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सोसायटी या संस्थेमध्ये दुकान गाळ्यांच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला असून दोन सत्ताधारी संचालकांसह आठ संचालकांनी अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्या मनमानीविरुद्ध एल्गार पुकारला आहे . पत्रपरिषदेमध्ये मानद सचिव चितांग कदम यांनी सांगितले 31 जानेवारी 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जिन क्र. 2 मधील 14 दुकान गाळ्यांच्या बांधकामाचा विषय चर्चेला आला. संस्थेने नेमलेले सल्लागार अभियंता प्रणव कदम यांनी हे काम 875 रुपये प्रती चौरस फूट अधिक जीएसटी या दरात होऊ शकते, अशी माहिती सभागृहास दिलेली असताना वैभव कोसलगे या ठेकेदारास 1425 रुपये चौरस फूट असा दर दिला.
बैठकीत सर्व निविदाधारकांना बोलावून, चर्चा करून दर कमी करण्याचे ठरले होते. मात्र अध्यक्षांनी इतर संचालकांना विश्वासात न घेता स्वतःच टेंडर उघडून ठेकेदाराशी केवळ 25 रुपयांची कपात करून काम मंजूर केले. यामुळे संस्थेचे अंदाजे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संचालकांनी केला आहे.
 
 
याशिवाय, यावर्षी जिनिंग व प्रेसिंग युनिट बंद राहिल्यामुळे संस्थेला 12 ते 15 लाख रुपयांचा फटका बसला. चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना ग्रॅच्युईटी व रजा रोखीकरणासाठी अंदाजे 19 लाख रुपये देण्यात आले, ज्यामुळे संस्थेवर अतिरिक्त आर्थिक ताण पडल्याचे सांगितले.
त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आली. अन्यथा संस्थेच्या हितासाठी सभासदांना विश्वासात घेऊन आंदोलन व उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या पत्रपरिषदेला मानद सचिव चितांग कदम व कपिल चव्हाण या सत्ताधारी संचालकांसह सतीश नाईक, डॉ, संजय माने, डॉ. भगवान देवसरकर, डॉ. संजय कदम, अतुल पाटील हे संचालक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0