लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का: पडताळणीनंतर ८६ लाख लाभार्थी कमी

19 Feb 2026 09:29:26
मुंबई,
Big blow to Ladki Bhaini scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. आधाराधारित ओळख पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तब्बल ८६ लाख लाभार्थी योजनेतून कमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षीपर्यंत राज्यात सुमारे २ कोटी ४० लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र पडताळणी मोहिमेनंतर डिसेंबर २०२५ मध्ये केवळ १ कोटी ६० लाख महिलांनाच शेवटचा हप्ता मिळाला. जानेवारीच्या मध्यावर हा हप्ता वितरित करण्यात आला होता.
 
 
Ladki Bahini scheme
सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत २ कोटी ४० लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी सुमारे १ कोटी ९० लाख महिलांनी ओळख पडताळणी पूर्ण केली. त्यापैकी ज्या महिलांची माहिती अचूक होती अशा सुमारे १ कोटी ६० लाख महिलांनाच लाभ मिळू शकला. पडताळणी करताना अनेक महिलांकडून अर्ज भरताना चुका झाल्याचे समोर आले. कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना काहींनी चुकीचा पर्याय निवडला. परिणामी पात्र असूनही अनेकांना लाभापासून वंचित राहावे लागले. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही. संबंधित विभागांकडून आवश्यक निधी पूर्णपणे उपलब्ध न झाल्याने विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
योजनेचा लाभ योग्य आणि पात्र महिलांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा यासाठी ओळख पडताळणी सक्तीची करण्यात आली होती. परंतु प्रक्रिया गुंतागुंतीची ठरल्याने अनेक महिलांची नोंद अर्धवट राहिली किंवा चुकीची झाली. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ज्या पात्र महिलांकडून माहिती भरताना चुका झाल्या आहेत त्यांना दुरुस्तीची आणखी एक संधी देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत संकेतस्थळावरून माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नव्याने नोंदणी करण्याची मुदत मात्र संपलेली आहे.
Powered By Sangraha 9.0