ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा! video

19 Feb 2026 10:58:00
पुणे,
Birth anniversary at Shivneri महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज राज्यभर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. पहाटेपासूनच जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे शिवभक्तांची गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात जन्मोत्सव सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी गडावर उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. त्यांच्या हस्ते पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि शासकीय कार्यक्रमांची थाटात सांगता झाली.
 
 
Birth anniversary at Shivneri
 
गडावरील शिवाई देवी मंदिरात देवी आणि शिवरायांचा अभिषेक विधी पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, व्याख्याने आणि पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले होते. राज्यातील अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. कल्याण येथे ४२२ किल्ल्यांच्या नावांमधून शिवछत्रपतींचे भव्य चित्र उभे करण्यात आले. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी दोन दिवसांच्या परिश्रमातून हा अनोखा कलाविष्कार साकारला. धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. देवीच्या गाभाऱ्यात विशेष पूजा करून शिवअभिषेक करण्यात आला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयघोष केला.
 
 
सोलापूरमध्येही शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. मराठा वस्ती परिसरातील मंडळाने गेल्या सात वर्षांपासून ध्वनिवर्धक यंत्रणाविरहित शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. वाचविलेल्या खर्चातून परिसरातील महिलांना पारंपरिक साडी-चोळी भेट देण्याची उपक्रम राबवला जातो. या संकल्पनेचे शहरभर कौतुक होत आहे. याच दिवशी सोलापूरचे चित्रकार नितीन खिलारे यांनी शिवरायांच्या मोहिमेनंतरच्या विजयक्षणाचे पाच बाय आठ फूट आकाराचे चित्र साकारून त्यांना अनोखे अभिवादन केले. किल्ला जिंकल्यानंतर त्याची पाहणी करतानाचा प्रसंग त्यांनी आपल्या कॅन्वासवर जिवंत केला आहे. राज्यभरात शिवजयंतीचा जल्लोष आणि शिवरायांप्रती कृतज्ञतेची भावना आज सर्वत्र अनुभवायला मिळाली.
Powered By Sangraha 9.0