भरधाव कार कालव्यात कोसळलेल्या चौघांचा मृत्यू

19 Feb 2026 10:40:36
मथुरा,
Car falls into canal in Mathura उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. मगोर्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळली आणि थेट गोवर्धन कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघा भावांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. सर्वजण राजस्थानमधील डीग येथे लग्नसमारंभासाठी जात होते.
 

Car falls into canal in Mathura 
 
बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास महावन परिसरातील बलदेवगड येथील राहुल वर्मा, तसेच प्रेमनगर कलान येथील अमित आणि मोहित हे तिघे भाऊ आणि त्यांचा एक मित्र कारने निघाले होते. नागला देविया गावाजवळील वळणावर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार प्रथम दुभाजकावर धडकली आणि त्यानंतर पाण्याने भरलेल्या कालव्यात जाऊन पडली. जोरदार प्रवाहामुळे संपूर्ण वाहन पाण्यात बुडाले.
 
अपघाताचा आवाज ऐकून जवळील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. काहींनी तत्काळ पोलिसांना कळवले, तर काहींनी धाडस करून कालव्यात उडी मारून मदतीचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सुरुवातीला बचावकार्य कठीण झाले. नंतर दोऱ्यांच्या सहाय्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी सुमारे पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर चौघांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने कारही कालव्यातून बाहेर काढण्यात आली.
Powered By Sangraha 9.0