लग्नसमारंभात चाकूहल्ला दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
धुळे,
Dhule knife attack धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातील नीलकंठ नगर परिसरात सुरू असलेल्या लग्नसमारंभात अचानक झालेल्या भीषण चाकूहल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान रविवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
 

Dhule knife attack, Pimpalner wedding attack 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या काही नातेवाईकांमध्ये जुना वाद पुन्हा उफाळून आला. साखरपुड्यापूर्वी काही व्यक्तींनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे वातावरण आधीपासूनच तणावपूर्ण होते. त्याच वादातून अचानक काहींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
 
 
या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५) आणि सुरेशगीर सुरेश मोजगीर गोसावी (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
 
 
या घटनेमुळे पिंपळनेर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लग्नसमारंभात घडलेल्या या रक्तरंजित प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नेमके कारण आणि हल्ल्यामागील कटकारस्थान याबाबत अधिक माहिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.