अजितदादांशी 'तेव्हा' धान चुकाऱ्यांबाबत चर्चा केली होती : प्रफुल्ल पटेल

गोंदियात पत्रकारांशी बोलताना दिली प्रतिक्रिया

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
गोंदिया, 
Discussion with Ajitdada: Praful Patel अजित दादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन गेला होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज, बुधवार १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली असून मी दिल्ली येथे होतो व हे खरं त्यांच्याशी माझी फोन वरती चर्चा झाली होती. कोणत्या एका फाईल साठी नाही तर शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्यांविषयी आमच्या दादाबरोबर चर्चा झाल्या. आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून माझ्यासह अनेकांचे त्यांना फोन आले असतील. मी फोन केला होता याचा अर्थ असं नाही की, मी त्यांना थांबविण्यासाठीचा प्रयत्न केला. मला तर माहीतही नव्हतं की ते मुंबईला होते की कुठे होते ते, आणि जे काही घडले काय दुर्लक्ष झाले ते सीबीआय चौकशीतून पुढे येईल. अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
gfh77
 
खा. पटेल हे गोंदिया - भंडारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज, बुधवारी त्यांनी गोंदिया येथील निवासस्थानी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भेटीदरम्यान जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न तसेच प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. प्रसंगी रोहित पवार यांनी केलेल्या पायलटने अजित दादांचे विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, या आरोपाविषयी खा. पटेल यांना विचारणा केली असता, त्यांनी केला यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया देत मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही, असे सांगितले. अजित दादांचं जानं ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेची सखोल तपासणी विविध यंत्रणेद्वारे होत आहे.
 
 
राज्य शासनाकडूनही तपास करण्यात येत आहे. परंतु अनेक लोकांनी शंका-कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे काल, निवेदन देऊन तशी मागणी केली असल्याचे खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले. अजित पवारांचा ज्या विमानात अपघात झाला, त्याचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आली होती. यावर प्रफुल्ल पटेल यांनी ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. मात्र, स्वायत्त संस्था ए ए आय बी याची चौकशी करत आहे. त्यांचेकडे कुणीही चौकशी करु शकत नाही. ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला तर ते डिकोड करण्याचं तंत्रज्ञान अमेरिकेत आहे. त्यांच्याकडे टेक्निकल एक्सपर्ट आहेत. तेव्हा अमेरिकेकडे ते पाठवून त्यातून डी कोड करून आपल्याला माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलगीकरणावर होत असलेल्या चर्चांबाबत विचारणा केली असता अजित दादाच्या निधनानंतर आम्हाला याच्यातून सावरायचे आहे. आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही. आमचा पक्ष वेगळा आहे, आम्हाला काय करायचे ते आम्ही ठरवू. आमच्या पक्षाच्या बाबतीत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवल्या आहेत. मात्र, येत्या २६ तारखेला विधिमंडळाच्या नेत्या, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी ह्याच राहतील. अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.