पोलिस भरतीसाठी उच्च विद्या विभूषीतही उतरले मैदानावर

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
 
वेध
 
police recruitment प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यात पोलिस भरती सुरू झाली आहे. शिपाई पदासाठी होत असलेल्या या भरतीसाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. मात्र, मोठ्या संख्येत अगदी डॉक्टर, अभियंता पदवीप्राप्त उच्च विद्या विभूषीत उमेदवार या पोलिस भरतीमध्ये उतरले आहेत. हे पाहुन एककीकडे पोलिस विभाग या उच्च विद्या विभूषीत उमेदवारांमध्ये सक्षम होणार असल्यामुळे समाधान वाटत असले तरी, डॉक्टर, अभियंत्यांना पोलिस शिपाई पदाची नोकरी पत्करावी लागणे म्हणजे त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग योग्य ठिकाणी होत नसल्याने मन खिन्न होत आहे.
 

police bharti 
 
नागपूरच्या पोलिस दलाचा विचार केल्यास 595 पदांसाठी होत असलेल्या या भरती प्रक्रीयेत तब्बल 36 हजार 222 तरूण तरूणींनी अर्ज केले आहेत. पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि मुख्यालय उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात दररोज 800 उमेदवारांची मैदानी चाचणी होत आहे. चार दिवसांपासून राज्यात ही पोलिस भरती सुरू असून 17 हजार जागांसाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात मैदानी चाचणी सुरू आहे. मुंबई आणि पुणे नंतर सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार नागपूरच्या पोलिस भरतीत सहभागी झाल्याचे पहायला मिळत आहे. तब्बल 9 हजार 775 पदवीधर युकव युवती व 1 हजार 729 पदव्यूत्तर उदेवारांचा यात समावेश आहे. यात अभियंत्यांची संख्या 400 पेक्षाही जास्त असून 127 एमबीए, 801 एमए, 4 हजार 741 बीए आणि 1 हजार 700 बी. एस्सी झालेले उमेदवार आहेत. विशेष म्हणजे 7 एलएलबी व 3 एलएलएम शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी महिला पोलिस पदांसाठी फार प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, या पोलिस भरतीत 9 हजार 973 तरूणींनी नागपूर पोलिस भरतीसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 2 हजार 711 महिला उमेदवार पदवीधर तर, 685 पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आहेत. 6 हजार 577 बारावी उत्तीर्ण महिला उमेदवार पोलिस भरतीसाठी सज्ज आहेत. यापूर्वी देखील पोलिस भरती झाली आहे. पण, त्यात अशाप्रकारे उच्च शिक्षित उमेदवार कधी तरल्याचे उदाहरण अभावानेच बघायला मिळत होते. कदाचीत काही आयपीएस अधिकारी होण्यासाठी डॉक्टर, अभियंत्यांनी अर्ज केले असतील. त्यापैकी काही पोलिस अधिकारी देखील झाले असतील. पण, पोलिस शिपाई पदासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येत उच्च शिक्षितांनी तयारी केली असावी. पोलिस शिपाई पदासाठी यापूर्वी फारसे कोणी ईच्छुक नसायचे. कारण, या पदासाठी असलेली वेतनश्रेणी. कामाचे तास, त्यातही कामात असलेली जाखीम. चोवीस तास कर्तव्यावर हजर रहावे लागणे. शिवाय लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन. या सर्वांचा विचार करता उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार या पदाच्या भरतीसाठी कधी उतरले नव्हते. फारतर एमपीएससीमार्फत पोलिस उपनिरीक्षक व तत्सम पदांच्या नोकरी भरतीसाठी मोठ्या संख्येत उमेदवार ईच्छुक असतात. मात्र, वाढलेली सुशिक्षित बेरोजगारांची संख्या, अभियांत्रीकीची पदवी घेतल्यावरही नोकरीसाठी मंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, बंगलोर इत्यादी शहरातच जावे लागत असल्याने त्या शहरात राहण्याचा खर्च व मिळारे पॅकेज याचा मेळ न बसणे. तर, काही उमेदवारांच्या कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांनी पोलिस शिपायाची नोकरी पत्करणेही मान्य केले असावे. आज केंद्र आणि राज्य सरकार कौशल्याधारित शिक्षणावर भर देत आहे. विविध कंपन्या व कारखान्यांमध्ये लागणाऱ्या कामगारांना आवश्यक कौशल्य अवगत असावे म्हणून कौशल्य शिक्षण शासनाने सुरू केले आहे. पण, आज सर्वांची अपेक्षा सरकारी नोकरी मिळावी, अशी आहे.
 
हे देखील कारण पोलिस भरतीत उच्च शिक्षितांची संख्या वाढण्यामागे असावी, असे वाटते. तसेच, कोरोनापासून मुला मुलींची लग्न होण्यास अडथळे येत आहे. त्यामध्ये वधूपित्याकडून मुलगा एकतर सरकारी नोकरीवाला असावा. कंपनीत नोकरी असल्यास घरी शेतीवाडी असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तेव्हा, लग्न होईपर्यंत तरी सरकारी नोकरी म्हणून पोलिस शिपाई होण्याची तयारी उच्च शिक्षित युवकांनी केली असावी. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने विचार केल्यास पोलिस विभागात आता अभियांत्रिकी पदवीधारक भरती होत असल्याने पोलिस विभाग टेक्नोसावी होण्यास मदत होणार आहे. संगणक व आंतरजालचा वापर करून गुन्हेगारांकडून सायबर गुन्हे केले जात आहेत.police recruitment बँक खात्यातून पैसे परस्पर उडविल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो, ऐकतो. हे गुन्हे शोधण्यासाठी पोलिसांनी सायबर सेल स्थापन केला आहे. मात्र, त्यात काम करणारे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत. अभियांत्रिकी पदवीधारक त्या पदावर काम करतील तर, सायबर गेन्ह्यांचा शोध व गुन्हेगारांचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे. ईच्छुक महिला उमेदवारांची संख्या देखील लक्षणीय असल्याने महिला विषयक गुन्ह्यांचा तपास, सडकछाप मजनूंवर कारवाई करणे, नियंत्रण ठेवणे यात मदत होणार आहे. पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी देखील उच्चशिक्षित तरूण तरूणींचा कल मोठ्या प्रमाणात पोलिस भरतीकडे असल्याने पोलिस दलाला सक्षम कर्मचारी मिळतील. या उमेदवारांचे शिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याचा पोलिस दल योग्य वापर करून शकणार आहे. ही पोलिस दलासाठी सकारात्मक बाब असल्याचे म्हटले आहे.
 
उच्चशिक्षित उमेदवार पोलिस दलात भरती झाल्यावर नागरिकांनाही सुरक्षेबरोबरच चांगली वागणूक मिळण्याची अपेक्षा आहे. तेव्हा, उच्च विद्या विभूषीत उमेदवार पोलिस दलात भरती होणे ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.
 
विजय कुळकर्णी
8806006149