सकल हिंदू समाजातर्फे शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा

19 Feb 2026 17:40:24
सिरोंचा, 
shiv jayanti ‘जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी घोषणांनी आज सिरोंचा शहर अक्षरशः दणाणून गेले. सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित शिवजयंती उत्सवाने शहरात अभूतपूर्व उत्साह निर्माण केला. स्थानिक शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावत इतिहासाच्या साक्षीने हिंदू जागृतीचा नवा अध्याय लिहिला.
 

शिव जयंती सिरोंचा  
 
 
 
आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिषेक करण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक-युवती तसेच सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिववंदनेने होताच संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. या सोहळ्याचा मुख्य उद्देश हिंदू जागृती हा असून, त्यानुसार संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराज चौक भगव्या ध्वजांनी, फुलांच्या आकर्षक सजावटीने व दीपमाळांनी सुशोभित करण्यात आला होता. चौकात उभारलेले व्यासपीठ, शिस्तबद्ध मांडणी आणि स्वयंसेवकांचे नियोजन यामुळे कार्यक्रमाला भव्यतेची झळाळी लाभली. युवकांचा उसळलेला उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि शिवचरित्रावर आधारित घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. शिवरायांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश या सोहळ्यातून प्रभावीपणे देण्यात आला. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पडला, ही बाब उपस्थितांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.shiv jayanti कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सकल हिंदू समाजाच्या पदाधिकार्‍यांचे व स्वयंसेवकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवजयंतीनिमित्त सिरोंचात उसळलेली ही शिवगर्जना संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, पुढील काळातही अशाच प्रकारे सामाजिक एकतेचे आणि सांस्कृतिक जाणीवेचे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0