बंगळुरू/उडुपी,
Indian Navy confidential information leak देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरणात उडुपी पोलिसांनी महत्त्वाचे यश मिळवले आहे. भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपाखाली आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील अटकेची संख्या आता चारवर पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पश्चिम बंगालमधील आलिफ इस्लाम (वय २१) अशी असून तो सध्या केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मरायूर येथे वास्तव्यास होता. तेथूनच तो भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनशील माहिती परदेशात पाठवण्याच्या कारवायांत सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे.
२०२५ ची घटना
तपासादरम्यान मालपे आणि कोचीन शिपयार्डमधील काही कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. संबंधित शिपयार्डमध्ये कार्यरत काही व्यक्तींनी भारतीय नौदलाच्या जहाजांचे क्रमांक आणि इतर गोपनीय माहिती गुप्तपणे मिळवून ती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. ही माहिती व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शेअर केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणाचा तपास २०२५ च्या अखेरीस सुरू झाला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील रोहित आणि संत्री या दोघांना अटक करण्यात आली होती, तर डिसेंबर २०२५ मध्ये गुजरातमधील हिरेंद्रकुमार याला अटक झाली होती. आलिफ इस्लाम हा या संपूर्ण जाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.गोपनीय माहिती पाठवण्यासाठी वापरल्या गेलेल्या फेसबुक पेजचा मालक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या संदर्भात मालपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उडुपी पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने तपास पुढे नेत आहेत.
दरम्यान, आलिफ इस्लाम हा बांगलादेशचा नागरिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याची कागदपत्रे, मोबाईल डेटा आणि डिजिटल हालचालींची सखोल तपासणी सुरू असून संबंधित माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या प्रकरणाकडे तपास यंत्रणा अत्यंत गांभीर्याने पाहत असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.