मुंबई
Jaya Bachchan स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन Jaya Bachchan पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मुंबईत पार पडलेल्या ऑनर अवॉर्ड्स नाईट कार्यक्रमात त्यांनी पापाराझींना सुनावल्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक Karan Johar करण जोहर देखील त्यांच्या सोबत दिसत आहेत.
कार्यक्रमानंतर जया बच्चन आणि करण जोहर एकमेकांना भेटताना आणि आनंदाने संवाद साधताना दिसतात. करण जोहर यांनी त्यांना प्रेमाने मिठी मारल्याचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोघांमधील आपुलकी आणि हसतखेळत झालेला संवाद सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, याच दरम्यान पापाराझींनी जया बच्चन यांना कॅमेऱ्यासमोर पोझ देण्याची विनंती केली असता त्या चिडल्याचे दिसते.
व्हिडिओमध्ये पापाराझी “जया जी, जया जी” अशी हाक मारत असल्याचे ऐकू येते. त्यावर जया बच्चन यांनी स्पष्ट शब्दांत “पुरे झाले, पुरे झाले” असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काही क्षण परिसरात शांतता पसरल्याचे दिसते. जया बच्चन यांची पापाराझींवर नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी कॅमेऱ्यांच्या गर्दीवर आक्षेप घेतल्याचे प्रसंग व्हायरल झाले आहेत.
या संपूर्ण प्रसंगात करण जोहर यांची भूमिका मात्र वेगळी भासली. त्यांनी वातावरण हलके करण्याच्या हेतूने जया बच्चन यांचे कौतुक करत, “ झेन झी Gen Z पासून पापाराझींपर्यंत सगळेच तुमचे चाहते आहेत,” असे गंमतीने म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. हे ऐकून जया बच्चन मोठ्याने हसताना दिसतात. त्यानंतर करण यांनी त्यांना पुन्हा एकदा मिठी मारली. निघताना त्यांनी पापाराझींना वळून हसत, “तुम्हाला माझ्यामुळे फोटो मिळाला,” असे म्हणत परिस्थिती हलक्याफुलक्या अंदाजात हाताळण्याचा प्रयत्न केला.त्याच कार्यक्रमातील आणखी एका व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींना थोडे दूर उभे राहून छायाचित्रे घेण्यास सांगताना दिसतात. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सोशल मीडियावर नेहमीप्रमाणेच मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण त्यांच्या गोपनीयतेच्या आग्रहाचे समर्थन करत आहेत, तर काहींनी त्यांच्या कठोर भूमिकेवर टीका केली आहे.दरम्यान, जया बच्चन आणि करण जोहर यांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कार्यक्रमातील हा प्रसंग पुन्हा एकदा सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यातील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा ठरला आहे.