दिल्ली वार्तापत्र
modis sevatirth राजधानी दिल्लीतील रायसिना हिलवर असलेले आणि देशातील सत्तेचे सर्वोच्च केंद्र म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक आता तेथून स्थानांतरित करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ सेवातीर्थ या नवीन जागेत तर नॉर्थ ब्लॉक आाणि साऊथ ब्लॉकमधील मंत्रालय कर्तव्य भवन एक आणि दोन मध्ये हलवण्यात आली आहे. सेवातीर्थमध्ये पंतप्रधानांचे कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गंत आता राष्ट्रपती भवनाचा एकमेव अपवाद वगळता संसदभवन, पीएमओ, नॉर्थ ब्लॉक , साऊथ ब्लॉक आणि अन्य मंत्रालयांना नवीन अत्याधूनिक इमारती मिळाल्या आहे. मागील शुक्रवारी म्हणजे 13 फेब्रुवारीला जुन्या पीएमओत मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेत पंतप्रधान मोदी यांनी या ऐतिहासिक वास्तूचा निरोप घेतला.
पीएमओ देशातील सर्वोच्च सत्ता केंद्र आहे, सर्व मंत्रालयांवर पीएमओची भक्कम पकड असते. पीएमओच्या मंजुरीशिवाय सामान्यपणे मंत्रालयांना कोणतेच महत्वपूर्ण निर्णय घेत येत नाही. 1911 मध्ये ब्रिटिशांनी राजधानी कोलकातावरुन दिल्लीत आणली. दिल्लीत नवी राजधानी उभारण्यासाठी 20 वर्ष लागली. भारतासारख्या अवाढव्य देशाचा कारभार चालवण्यासाठी इंग्रजानीं 1931 मध्ये राजधानीतील रायसिना हिल या टेकडीवर व्हाईसरॉय हाऊस जे आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाते, संसदभवन तसेच नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकची उभारणी केली. साऊथ ब्लॉकलाच लागून पंतप्रधान कार्यालयाची म्हणजी पीएमओची इमारत होती. 13 फेब्रुवारी 1931 ला नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, पीएमओ, संसद भवन तसेच तेव्हाच्या व्हाईसरॉय हाऊसचे उदघाटन झाले होते, त्यामुळे नवीन पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजे सेवातीर्थच्या उदघाटनासाठी मोदी यांनी जाणिवपूर्वक 13 फेब्रुवारी ही तारिख निवडली होती. पंतप्रधान मोदी कोणतीही गोष्ट सहज करत नाही, तर त्यामागे मोठी दृष्टी असते.
15 ऑगस्ट 1947 ला देशात पहिल्यांदा पंतप्रधान सचिवालय अस्तित्वात आले. देशाचा गाडा चालवण्यासाठी भारतीय मानसिकतेची शासकीय यंत्रणा आवश्यक होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान एटली यांना विनंती केली की, मंत्रिमंडळ तसेच पंतप्रधान कार्यालय स्थापन करण्यासाठी मला अभ्यास कराण्यासाठी मदत करा. त्यानुसार एटली यांनी इंग्लंडचे तत्कालिन कॅबिनेट सचिव लॉर्ड नॉर्मन ब्रुक आणि माजी कॅबिनेट सचिव लॉर्ड एडवर्ड ब्रिजेस यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. भारतातील पंतप्रधान कार्यालयाची रचना 10 डाऊनिंग स्ट्रीट या इंग्लंडच्या पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर तेव्हा तयार करण्यात आली होती.
सुरुवातीला आपल्या देशातील पंतप्रधान सचिवालयाची रचना पंतप्रधानांना त्यांच्या शासकीय कामाच्या दृष्टीने मदत करण्यासाठी करण्यात आली होती. त्यावेळी कॅबिनेट सेक्रटरी हे पद नव्हते. तर पंतप्रधानांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी हे पद होते. नेहरु यांना पंतप्रधान सचिवालय अधिक मजबूत करायचे होते, पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला.
लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना एल.के. झा यांना प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी बनवायचे होते. पण पंतप्रधान सचिवालयाला अन्य मंत्रालयाप्रमाणे स्वतंत्र दर्जा मिळावा, वॉरंट ऑफ प्रसिडेन्समध्ये आपले स्थान कॅबिनेट सेक्रेटरीच्या दर्जाएवढे असावे तसेच आपण पंतप्रधानांचे सचिव म्हणून ओळखले जावे, अशी अट झा यांनी घातली आणि शास्त्री यांनी ती मान्य केली. त्यानंतर पंतप्रधान सचिवालयाचा विस्तार करण्यात आला.
इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना पंतप्रधान सचिवालय खुप शक्तिशाली झाले. सुपर कॅबिनेट म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 1977 मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान सचिवालयाचे महत्व आणि अधिकार कमी करण्यासाठी त्याचे नाव पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) असे केले. तेव्हापासून हे कार्यालय पीएमओ म्हणूनच ओळखले जात आहे.
रायसिना हिलवरील पंतप्रधान कार्यालयाने आतापर्यंत 18 पंतप्रधान पाहिले. यात दोन कार्यवाहक आणि 16 पूर्णकालिन पंतप्रधानांचा समावेश होता. गुलझारीलाल नंदा यांनी दोनवेळा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम केले. एका महिला पंतप्रधान म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीचाही पंतप्रधान कार्यालयाने अनुभव घेतला. राजीव गांधींसारखा सर्वात तरुण पंतप्रधानही या कार्यालयाने पाहिला. तर मोरारजी देसाई यांच्यासारख्या सर्वात ज्येष्ठ म्हणजे 81 वर्षाचा पंतप्रधानही पीएमओने पाहिला. देसाई भारतातील पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कामाचाही अनुभव पीएमओने घेतला. डॉ.मनमोहनसिंग हे देशातील पहिले शीख पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरु यांनी सर्वाधिक म्हणजे 17 वर्ष पंतप्रधानपद भूषवले. नेहरुनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नावावर आहे. इंदिरा गांधी तीनदा देशाच्या पंतप्रधान होत्या. पण सलग तीनवेळा पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम नेहरुनंतर नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही तीनदा पंतप्रधानपद भूषवले, पण वाजपेयी सलग तीनदा पंतप्रधान नव्हते. पण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी देशातील पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान होते. अविश्वास प्रस्तावामुळे पद सोडावे लागणारे विश्वनाथप्रतापसिंह हे पहिले पंतप्रधान होते, तर एकही दिवस संसदेत येऊ न शकणारे चौधरी चरणसिंहही पीएमओने पाहिले. इंद्रकुमार गुजराल आणि एच.डी देवेगौडा यांच्यासारखे पंतप्रधानही या कार्यालयाने अनुभवले.
पंतप्रधान कार्यालयाने भारताच्या परराष्ट्र धोरणाला येथेच आकार दिला, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक निर्णयही या ठिकाणी करण्यात आले. भारताच्या अलिप्त राष्ट्र चळवणीचा साक्षीदारही हेच पंतप्रधान कार्यालय होते.
1962 च्या भारत पाक युध्दाच्या वेळी तेव्हाचे पंतप्रधान साऊथ ब्लॉकमध्येच ठाण मांडून बसत होते. 1965 च्या भारत पाक युध्दाच्या वेळी तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री साऊथ ब्लॉकमध्येच मुक्कामाला होते. 1971 ला भारत पाक युध्दाच्या व्यूहरचनेला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याच साऊथ ब्लॉकमधील वॉर रुममधून अंतिम रुप दिले होते.modis sevatirth पंतप्रधान कार्यालय म्हणजे देशाशी संबंधित अनेक ऐतिहासिक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे. या कार्यालयाने जसे इतिहास घडवणारे पंतप्रधान पाहिले, तसेच इतिहासात आपला ठसा उमटवू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यशैलीचाही अनुभव घेतला. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडवला आहे, जो आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधानाला घडवता आला नाही. मोदी यांनी देशाच्या राजधानीचा कायाकल्प केला, चेहरामोहरा बदलून टाकला. जुना इतिहास बदलत नवा इतिहास रचला आहे. हा फक्त पंतप्रधान कार्यालयाच्या इमारतीत झालेला बदल नाही तर देशाच्या मानसिकतेत झालेला सकारात्मक बदल आहे, आत्मविश्वासाने ओतप्रोत देशाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताच्या दिशेने टाकलेले दमदार आणि आश्वासक पाऊल आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
...................................................