गोंदियातील तरुणीची भोपाळमध्ये प्रेमसंबंधातून हत्या

19 Feb 2026 10:00:21
भोपाळ,
Murder of a young woman in Gondia मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सामाजिक माध्यमातून सुरू झालेल्या ओळखीचा शेवट अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील ३३ वर्षीय आश्रफी उर्फ सिया हिची हत्या करून तिचा मृतदेह सांडपाणी टाकीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी समीर नावाच्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सियाची समीरशी सामाजिक माध्यमावर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि तीन महिन्यांपूर्वी सिया भोपाळमध्ये समीरसोबत राहण्यासाठी आली. तपासात समीर हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे समोर आले. सिया त्याच्याकडे विवाहासाठी आग्रह धरत होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घरातील तणाव वाढल्याने समीरची पत्नी माहेरी निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे.
 

woman in Gondia 
सोमवारी संध्याकाळी दोघांमध्ये झालेल्या तीव्र वादानंतर समीरने रागाच्या भरात सियाचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचे पुरावे लपवण्यासाठी त्याने आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली. सियाचा मृतदेह लोखंडी पेटीत ठेवून त्यात दगड टाकण्यात आले आणि घराशेजारील रिकाम्या जागेतील सांडपाणी टाकीत फेकण्यात आला. काही दिवसांनी त्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी पाहणी केली असता टाकीत पेटी तरंगताना दिसली. याची माहिती पालकांमार्फत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पेटी बाहेर काढून उघडली असता त्यात सियाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. हातावरील गोंदण आणि त्यावरील जन्मतारीख यावरून तिची ओळख पटवण्यात आली. प्रकरणात पोलिसांनी समीरची आई, भाऊ आणि बहिणीला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी समीरलाही अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे हे भयावह रूप समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0