भयानक...मधमाश्यांच्या दंशाने मैदानावरील पंचाचा मृत्यू

19 Feb 2026 10:44:53
उन्नाव,
Pancha dies from bee sting उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान घडलेल्या अनपेक्षित घटनेत कानपूर क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ पंच माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला. शुक्लागंजमधील सप्रू मैदानावर केडीएम लीगचा सामना रंगला असताना अचानक मधमाश्यांचा थवा मैदानावर आला आणि पंच तसेच खेळाडूंवर हल्ला चढवला. दुसरा डाव सुरू असताना ही घटना घडली. मधमाश्यांनी काही मिनिटे सातत्याने चावल्यामुळे माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले. इतर काही खेळाडूंनाही दंश झाला. परिस्थिती बिघडल्याने गुप्ता यांना तातडीने शुक्लागंज येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी हृदयरोग विभागात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 

Pancha dies from bee sting
 
माणिक गुप्ता हे कानपूरच्या फील्डखाना परिसरातील रहिवासी होते आणि सुमारे तीन दशकांपासून कानपूर क्रिकेट संघटनेशी जोडलेले होते. त्यांच्या पश्चात चार मुली आणि कुटुंबीय आहेत. गुरुवारी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. घटनेविषयी बोलताना एका पंचाने सांगितले की, सामना सुरू असताना अचानक मधमाश्या दिसू लागल्या. खेळाडूंना खाली झोपण्यास सांगण्यात आले, तरीही हल्ला थांबला नाही. या दुर्दैवी प्रकारामुळे क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0