पुणे,
Pune Railway Station crowd, पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. १८) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास तिकीट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. स्थानकाच्या आतील बाजूस दोन आणि मेन गेटच्या बाजूस दोन, अशा एकूण चार तिकीट खिडक्या चालू होत्या, तरीही प्रवाशांची संख्या या क्षमतेच्या पलीकडे असल्यामुळे नागरिकांना तिकीट घेण्यासाठी दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागले.
पुणे रेल्वे स्थानकावर दैनंदिन प्रवाशांची संख्या दीड ते दोन लाख दरम्यान असते, त्यामुळे येथे कायमच वर्दळ असते. त्यात आरक्षण तिकीट काढणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने गर्दी अधिक जाणवते. याशिवाय, ऐनवेळी गाडी पकडणारे प्रवासी जनरल तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांकडे धाव घेतात. स्थानकावर आतील बाजूस तीन, मुख्य गेटच्या शेजारी तीन आणि ताडीवाला रोडच्या बाजूस एक अशी एकूण सात तिकीट खिडक्या असून २० व्हेंडिंग मशीन देखील आहेत. मात्र, बुधवारी दुपारी काही व्हेंडिंग मशीन बंद असल्याने नागरिकांना मुख्य तिकीट खिडक्यांकडेच विसंबावे लागले, परिणामी रांगा वाढल्या.गर्दीचे प्रमाण वाढल्यामुळे काही प्रवासी मध्ये घुसून तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे अधिक गोंधळ निर्माण झाला. दुपारनंतर अनेक Pune Railway Station crowd, प्रवासी कामानिमित्त, शैक्षणिक कारणांसाठी तसेच गावी जाण्यासाठी स्टेशनवर येतात. काही गाड्यांच्या सुटण्याची वेळ जवळ असल्यामुळे प्रवाशांमध्ये घाई वाढते. लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागला.
रेल्वे प्रशासनाने अशी परिस्थिती लक्षात घेत, गर्दी नियंत्रणासाठी त्वरित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसह तिकीट खिडक्यांवर सुव्यवस्थित व्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाला अतिरिक्त उपाययोजना करणे गरजेचे आहे.