पुणे,
Shinde's emotional speech on Shivneri पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच शिवनेरीवरून भाषण केले. त्यानंतर बोलताना एकनाथ शिंदे भावूक झाले. गेल्या वर्षी याच ठिकाणी अजित दादा आपल्या सोबत होते, अशी आठवण त्यांनी काढली आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. काही क्षण ते भावनाविवश झाल्याचे दिसून आले. आपल्या भाषणात शिंदे यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत हा दिवस तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा असल्याचे सांगितले. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, धैर्य, त्याग आणि समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. आदर्श राज्यकारभार कसा असावा याचे उदाहरण शिवरायांनी घालून दिले, असेही ते म्हणाले.
शिवनेरीवर येताना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे सांगत गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी व्यापक उपक्रम हाती घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी नियोजन केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवरायांचे निस्सीम भक्त असून त्यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन सरकार काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवरायांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची गरज असल्याचे आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले.