धमतरी,
Shocking incident in Chhattisgarh छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यातील कुरुड विकास गटातील दहादहा गावातील शासकीय माध्यमिक शाळेत घडलेल्या एका प्रकाराने प्रशासनाची झोप उडवली आहे. या शाळेतील तब्बल ३५ विद्यार्थ्यांच्या मनगटांवर जखमा आढळल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांनी धारदार वस्तूंनी स्वतःच्या हातांवर जखमा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी काही पालकांनी आपल्या मुलांच्या मनगटांवर कापल्याच्या खुणा पाहिल्या आणि ही बाब शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. शाळेकडून चौकशी सुरू करण्यात आली असता एक-दोन नव्हे तर सुमारे तीन डझन विद्यार्थी अशा प्रकारात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शाळेने तात्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सूरज बंचोर, शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलिस तसेच वैद्यकीय पथक शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तपासादरम्यान असे आढळून आले की सुमारे महिनाभरापूर्वी काही विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहून हा प्रकार सुरू केला. काहींनी पेन्सिल, काहींनी काटेरी झाडांचे काटे, तर काहींनी पात्यासारख्या वस्तूंचा वापर करून मनगटांवर जखमा केल्या.
सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या जखमा भरून येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी असे पाऊल का उचलले, याचा सखोल तपास सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी सामाजिक माध्यमांवरील दृश्यांचा प्रभाव किंवा इतर कारणांचा संशय व्यक्त केला आहे. वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली असून त्यांचे आणि पालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.