पुणे,
Sunetra Pawar's on Shivneri पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या मुख्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण करत उपस्थितांना प्रेरित केले. शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचे क्षण आठवले. त्या वेळी आपल्या डोळ्यांसमोर जिजाऊ मातेचे तेजस्वी रूप उभे होते, असे त्यांनी सांगितले आणि त्या प्रेरणेनेच पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अजित पवार यांनी आयुष्यभर ज्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीचा स्वीकार केला, त्याच मार्गावर आपण ठामपणे चालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवनेरी किल्ल्याशी अजित पवार यांचा विशेष जिव्हाळा होता, त्यांनी येथे अनेकदा जनतेशी संवाद साधला आणि किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले, याची आठवणही त्यांनी करून दिली. मागील अर्थनियोजनात आग्रा, संगमेश्वर, रायगड आणि वढू बुद्रुक या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी उपक्रम हाती घेतल्याचे सांगत त्यांनी या कामांमुळे भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या या भव्य सोहळ्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुनेत्रा पवार यांनी जिजाऊंच्या त्यागाचा उल्लेख करत सामाजिक न्याय, शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प मांडला. अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची त्यांनी घेतलेली शपथ उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन स्वागत केले.