प्रवाशांना पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी!

19 Feb 2026 21:22:44
तिवसा,
police station नागपूर जिल्ह्यातील गणेशपेठ आगाराच्या बसमधून मोझरी-तिवसा येथील प्रवाशांना वारंवार अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, बुधवारी रात्री एका वाहकाने प्रवाशांना थेट पोलिस स्टेशनला नेण्याची धमकी दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

पोलिस ठाण्यात 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपेठ आगाराची संभाजीनगर-नागपूर (क्र. एम एच ४० सी एम ६०६५) ही बस बुधवारी रात्री अमरावती येथे उभी असताना वाहक एन. एच. थेर आणि चालक मस्के यांनी मोझरी-तिवसा येथील प्रवाशांना बसमध्ये बसू नका, अन्यथा बस थेट पोलिस स्टेशनला नेण्यात येईल, अशी उघड धमकी दिली. या धमकीमुळे अनेक वृद्ध, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी काही प्रवाशांना नाईलाजास्तव बसमधून खाली उतरावे लागले. दरम्यान, अभिजित साबळे नावाचा एक प्रवासी बसमध्येच बसून राहिला. काही अंतरानंतर त्याला तिवसापर्यंतचे तिकीट देण्यात आले आणि बस मोझरी बायपासमार्गे थेट तिवसा येथे नेण्यात आली.police station तिवसा येथे पोहोचल्यानंतर संबंधित प्रवासी आणि प्रहार संघटनेचे संजय देशमुख यांनी वाहकाला जाब विचारला असता, आम्ही नवीन आहोत, माहिती नव्हते, असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, गणेशपेठ डेपोच्या काही चालक-वाहकांकडून मोझरी-तिवसा येथील प्रवाशांबाबत सातत्याने भेदभाव केला जात आहे. बस थांबवण्यास नकार देणे, बसण्यापूर्वीच धमकी देणे, तिकीट देऊनही मध्येच उतरवणे किंवा बायपास मार्गाने बस नेणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
...तर शिस्तभंगाची कारवाई
-प्रवाशांकडून प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे प्रवाशांना बसमधून उतरविणे किंवा बस बायपासने नेण्याचा प्रकार घडला असल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तिवसा व मोझरी येथे सर्व आगारांच्या बसेसना अधिकृत थांबा देण्यात आला आहे. तसेच गणेशपेठ आगारातही याबाबत स्पष्ट सूचना लावण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा तक्रारी होऊ नयेत यासाठी संबंधित सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे तिवसा बसस्थानक प्रमुख प्रतीक माहोडे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0