शेवटच्या क्षणी माघार गंभीर; पाकिस्तानवर बंदीची मागणी – गावस्कर

    दिनांक :02-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Demand for ban on Pakistan २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची उलटी गिनती सुरू झाली असतानाच भारत–पाकिस्तान सामन्याभोवती पुन्हा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला विश्वचषकात सहभागी होण्यास परवानगी दिली असली, तरी १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आदेश दिल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह अनेक क्रिकेट बोर्डांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने शेवटच्या क्षणी भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आयसीसीने हस्तक्षेप करून कडक निर्बंध लादावेत, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा बहुचर्चित सामना १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.
 
 

Pakistan gavaskar 
 
गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील तीन वर्षांसाठी ‘हायब्रिड मॉडेल’अंतर्गत सामने खेळण्यावर सहमती झाली होती. त्या करारानुसार दोन्ही देशांनी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तटस्थ स्थळांवर सामने खेळण्याचे मान्य केले होते. मात्र, आता पाकिस्तानने अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे त्या करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या नव्या घडामोडींमुळे पाकिस्तानला काही इतर देशांकडून, विशेषतः बांगलादेशकडून, पाठिंबा मिळत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. सुनील गावस्कर यांनी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्पर्धेच्या अगदी तोंडावर माघार घेणे ही गंभीर बाब आहे.
 
 
जर एखाद्या संघाने आधीच नकार दिला असता, तर ती वेगळी गोष्ट ठरली असती; पण अंतिम टप्प्यातील असा निर्णय संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर परिणाम करतो. त्यामुळे आयसीसीने याकडे दुर्लक्ष न करता ठोस पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले. गावस्कर यांच्या मते, आयसीसीकडून होणारी कारवाई ही केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नसून भविष्यात इतर कोणताही संघ अशा प्रकारचा निर्णय घेण्याचे धाडस करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी असावी. ही कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल, हे ठरवणे आयसीसी आणि संबंधित क्रिकेट बोर्डांवर अवलंबून असले तरी, हा निर्णय सामूहिक असावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शिस्तीसाठी महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.