कणकवली
Nitesh Rane जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे (Nitesh Rane) विधान जोरदार चर्चेचा विषय बनले आहे. फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सभेत नितेश राणे म्हणाले, “कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देतो. पण चुकून मशाल चिन्ह निघालं, तर असलेला निधीही कमी करून टाकतो.” त्यांनी यासोबतच दावा केला की ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी सर्व सरपंचांना स्पष्ट सांगितले होते की, “आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सर्व सरपंच पटापट आमचे झाले.”
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक एकतर्फी होत असल्याचा दावा करत नितेश राणे म्हणाले की, “प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का करायचं, असा प्रश्न लोकांना पडला आहे. ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. गेली 27 वर्षे जिल्हा परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढील पाच वर्षेही राहील. जिल्ह्याचा विकास खासदार नारायण राणे आणि महायुतीच करू शकते,” असे ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, “उबाठाची आम्हाला कोणतीही चिंता नाही. जे काही उमेदवार उरले आहेत, ते प्रचार करतानाही दिसत नाहीत, काही तर लपत फिरत आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा निधीसाठी आमच्याकडेच यावं लागणार आहे,” असे टोले त्यांनी लगावले.फोंडा मतदारसंघातील मतदारांना थेट आवाहन करत नितेश राणे म्हणाले, “फोंडा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. मला या मतदारसंघात नंबर वन लीड द्या, पहिला एक कोटी रुपयांचा निधी देतो,” अशी जाहीर घोषणा त्यांनी केली.राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. विरोधक हे विधान कधीकाळी निवडणूक प्रक्रियेतील दबाव म्हणूनही पाहत आहेत आणि आगामी काळात यावर तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.