मुंबई,
Urfi Javed अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या व्यावसायिक कामापेक्षा अधिक तिच्या हटके आणि प्रयोगशील पोशाखांमुळे कायम चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र, फॅशनसोबतच तिचे वैयक्तिक आयुष्य आणि वैचारिक मतेही वारंवार वादाचा विषय ठरत आहेत. अलीकडेच उर्फी जावेदबाबत मुस्लिम समुदायाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत तिला इस्लाममधून बहिष्कृत केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच तिचे नाव बदलून ‘गीता भारद्वाज’ ठेवण्यात आल्याच्या चर्चांनीही सोशल मीडियावर गोंधळ उडवला होता. या सर्व आरोपांवर आता उर्फी जावेदने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावरील Urfi Javed प्रभावशाली व्यक्ती फैजान अन्सारी यांनी एक व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, उर्फी जावेद केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांची प्रतिमा खराब करत आहे. उर्फी स्वतः कुराण किंवा इस्लामवर विश्वास ठेवत नसल्याचे सांगते आणि तिची फॅशन व विधाने इस्लामच्या शिकवणीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. याच आधारावर आपण अखिल भारतीय मुस्लिम समुदाय आणि धर्मगुरूंना पत्र लिहून उर्फी जावेदला अधिकृतपणे इस्लाममधून हद्दपार करण्याची मागणी केल्याचे फैजान अन्सारी यांनी सांगितले. त्यांनी उर्फीचा इस्लामशी काहीही संबंध नसून तिचे नाव आता गीता भारद्वाज असल्याचाही दावा केला होता.
या दाव्यांनंतर उर्फी जावेदने आपले मौन सोडत थेट प्रतिक्रिया दिली. इस्लाममधून हाकलून लावल्याच्या आरोपांवर ती म्हणाली की, तिने खूप पूर्वीच स्वतःहून इस्लाम सोडला आहे. “या गोष्टी कोण बनवत आहे? मी कोणत्याही धर्माचे पालन करत नाही,” असे स्पष्ट करत तिने आपण नास्तिक असल्याचे सांगितले. नाव बदलल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उर्फी म्हणाली की, ‘गीता भारद्वाज’ असे नाव असल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे असून ते लोक स्वतःहून पसरवत आहेत.
आपल्या विधानात उर्फी जावेदने प्रश्न उपस्थित केला की, “मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही मला कुठून हाकलून लावणार? जिथे मी अस्तित्वातच नाही, अशा ठिकाणाहून मला कसे काढून टाकाल?” तिच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सुरू असलेल्या चर्चांना नवा वळण मिळाले असून, सोशल मीडियावर या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.