अमरावती,
8 approved corporators in Amravati महानगर पालिकेची सर्वसाधारण आमसभा शुक्रवारी झाली. या सभेत ८ स्वीकृत सदस्याची घोषणा करण्यात आली. सोबतच १६ सदस्य स्थायी समितीवर पाठविण्यात आले. सभागृह, विरोधी पक्षनेता व गटनेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महापौर श्रीचंद तेजवानी सभेचे सभापती होती. उपमहापौर सचिन भेंडे, आयुक्त सौम्या शर्मा, नगर सचिव वडूरकर उपस्थित होते. मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. त्यानंतर सभागृह नेता म्हणून भाजपाचे चेतन गावंडे यांची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विलास इंगोले यांची नियुक्ती झाली. युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेतेपदी नाना आमले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर, शिवसेना - बसपा - उबाठा गटनेतेपदी डॉ. राजेंद्र तायडे, एमआयएम गटनेतेपदी शेख हमीद शेख वाहेद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नामनिर्देशित सदस्य
नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अॅड. प्रशांत देशपांडे व प्रा. संजय तिरथकर, शिवसेना गटाकडून दिनेश बुब, तर काँग्रेसकडून मिलिंद चिमोटे व अनिल अग्रवाल यांना संधी मिळाली आहे. युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोजराज काळे आणि एमआयएम सै. मुनज्जर अली यांना संधी देण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा सभापतींनी केली.
स्थायी समिती सदस्य
स्थायी समितीत भाजपाकडून मिलिंद बांबल, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सुर्यवंशी व विनोद तानवाईस यांना काँग्रेसकडून ललिता सुरेश रतावा, प्रशांत महल्ले व अम्मा फिरोज खान, युवा स्वाभिमान पक्षातून प्रशांत वानखडे, प्रियंका भुषण पाटणे व दिपक साहू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अविनाश मार्डीकर व मीनल सवाई तर एमआयएमकडून सल्लाउदद्दीन इक्राममुद्दीन व नाझीम खान करीम खान, शिवसेना गटातून मंजुषा जाधव यांना संधी मिळाली आहे. सभापतींनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
स्वच्छतेचा मुद्दा गाजला
प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहामध्ये शहरातल्या अस्वच्छतेचा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. स्वच्छतेसाठी नियुक्त कंत्राटी यंत्रणा कुचकामी असून यात मोठे बदल करण्याची गरज सदस्यांनी प्रतिपादीत केली. प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आश्वासन दिले. नवीन कंत्राटदारांना लवकरच काम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. नवनियुक्त सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव पारीत झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज थांबले.