अग्रलेख...
ai impact summit आपली सारी बुद्धिमत्ता पणाला लावून माणसाने विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्माण केलेल्या रोबोटच्या मेंदूत आज्ञावलीचा अफाट साठा भरला असला, तरी मन नावाचा मानवी अवयव त्यास बहाल करण्याचे तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध नाही, हे चांगलेच झाले. अन्यथा, भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या नव्या जागतिक वाटचालीस दिशा देणारे दालन ठरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक जागतिक परिषदेत सादर करण्यात आलेल्या त्या प्रयोगातील रोबोटने तिथल्या तिथे आपले मन मोकळे करून, गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधीचा खोटेपणा स्वतःच उघडकीस आणला असता किंवा आपल्या निर्मितीचे श्रेय घेणाऱ्या खोट्या माहितीने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्यादेखील केली असती.
राजधानी दिल्लीत सध्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’ नावाची जागतिक परिषद सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या संधीची दालने भारतासाठी खुली होण्याची मोठी संधी या परिषदेतून भारतास लाभली आहे. भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या परिषदेत ग्रेटर नॉयडामधील गलगोटियास युनिव्हर्सिटी या खाजगी विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेला ओरियॉन नावाचा यांत्रिक कुत्रा अभिमानाने मिरवला गेला. या कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यांत्रिक कुत्र्याचे तंत्रज्ञान आपणच विकसित केल्याचा दावाही या परिषदेत विद्यापीठाच्या प्रतिनिधीकडून केला गेला, तेव्हा तो ओरियॉन बाजूलाच उभा होता. आज्ञावलीनुसार आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविणाऱ्या काही यांत्रिक कृती त्याने करून दाखविल्या; या विद्यापीठाने त्याच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, या तद्दन खोट्या माहितीवर मात्र त्याला काहीच करता आले नाही. कारण रोबोट कृत्रिम असला तरी त्याला मेंदू असतो, पण माणसांसारखे मन नसते. अन्यथा आपल्याविषयी असे सांगणाऱ्या त्या प्रतिनिधीचा खोटेपणा त्याने लगेचच उघड केला असता. सुमारे दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियामधील गुमी सिटी कौन्सिल नावाच्या एका भागात प्रशासकीय कामासाठी तैनात रोबो एके दिवशी जिन्याच्या पायèयांवरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. सहसा यंत्रमानवाच्या तंत्रज्ञानात अशी कृती आढळत नसल्याने त्याने आत्महत्या केली, अशा चर्चेला जगभर ऊत आला. रोबोटला भावना नसतात, तरीही त्याचे निपचित होणे ही आत्महत्याच आहे, असा सूर बळावल्यानंतर, त्याच्या आत्महत्येची कारणे शोधण्यास सुरुवात झाली. कामाचा ताण असह्य झाल्याने व कामास प्रतिष्ठा मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली असा गमतीदार निष्कर्ष समाजमाध्यमांवर निघू लागला. काहींनी तर ही घटना भारतात घडल्याची पुस्तीही जोडली. प्रत्यक्षात हा त्यामधील तांत्रिक बिघाडाचा परिणाम होता हे खरे असले, तरी भावना किंवा मन नसलेल्या यंत्रमानवाशी माणसाचे नाते कसे असावे, यावर या चर्चेतून एक वेगळा प्रकाश पडला. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरक्षा रक्षकाचे काम करणाèया एका रोबोटने एका तळ्यात स्वतःस झोकून दिले, तेव्हाही नोकरीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा झालीच होती. पण रोबोटना मनच नसल्यामुळे थकवा, कंटाळा आणि खरेखोटेपणा अशा भावना नसतात, म्हणूनच गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधीची तद्दन खोटी फुशारकी सहन करूनही ओरियॉन नावाचा हा यांत्रिक कुत्रा शांतपणे बाजूला उभाच होता. या यांत्रिक कुत्र्याचे तंत्रज्ञान गलगोटियास युनिव्हर्सिटीत विकसित करण्यात आले आहे, असे या प्रतिनिधीने सांगितल्यानंतर लगेचच, प्रत्यक्षात मात्र तो चीनमध्ये बनविलेला रोबोट असल्याचे उघडकीस आले. समाजमाध्यमे किती जागरूक असतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने समाजमाध्यमांची बुद्धिमत्ता चाणाक्ष निष्कर्ष काढू शकते, हे त्याच वेळी स्पष्ट झाले. गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडताच त्यांना भारताच्या या प्रतिष्ठित मंचावरून गाशा गुंडाळण्याचा आदेश देण्यात आला. निखळ बुद्धिमत्तेचे पारदर्शकपणे स्वागत करण्यासाठी आयोजित या परिषदेच्या जागतिक मंचाचा गैरफायदा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘कॉपीपेस्ट तंत्रज्ञान’ या युनिव्हर्सिटीच्या अंगलट तर आले आहेच; पण या एका खोट्यापायी भारताच्या प्रतिष्ठेवरही समाजमाध्यमांतून प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत.ai impact summit यांत्रिक कुत्र्याचे तंत्रज्ञान चीनमध्ये विकसित झाले असून युनिव्हर्सिटीने दिलेली माहिती चुकीची व खोटी आहे, याची शहानिशा लगेचच समाजमाध्यमे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केल्यानंतर आता युनिव्हर्सिटीच्या स्टॉलची जागाच हटविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने, विद्यापीठाच्या या खोटेपणा किंवा खोडकरपणापायी कोणत्या अवघड परिस्थितीस आयोजकांना सामोरे जावे लागले असेल, याची कल्पना करता येणे कठीण नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात खोटेपणाला थारा नाही, हे आता या निमित्ताने उघड झाले ही त्यातील समाधानाची बाब मानावी लागेल. कारण या एका घटनेमुळे अशा प्रकारच्या जागतिक परिषदांमध्ये केवळ स्वतःच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचाच आविष्कार दिसला पाहिजे, असा फतवा जारी करून बजावण्याची वेळ सरकारी यंत्रणा व मंत्रालयावर आली. अर्थात युनिव्हर्सिटीच्या या खोटारडेपणामुळे भारताची अब्रू गेली, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण एका युनिव्हर्सिटीकडून कृत्रिम बुद्धिमत्तेची कॉपी उघडकीस आल्याने संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आक्षेप घेणे चुकीचे ठरणार आहे. याचा राष्ट्रीय प्रतिष्ठेवर काही परिणाम होईल किंवा कसे, हे लगेचच स्पष्ट होणार नाही, पण ही घटना या क्षेत्रात कायमची नोंदली जाणार असल्याने, या क्षेत्रात काम करणाèयांना आता अधिक पारदर्शकपणे व सावधपणे आपल्या बुद्धिकौशल्यावर आधारित तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे देशाच्या सामाजिक, सरकारी आणि राजकीय स्तरावर काहीसा परिणाम झाला आहे हे खरे आहे. कारण भारतीय प्रज्ञेचे प्रदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित परिषदेत चिनी बनावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले गेल्याच्या टीकेमुळे आता भारताची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील समुदाय, कंपन्या आणि विद्यापीठांना आता अधिक सखोल तपासणी आणि स्पष्टता व पारदर्शकता आवश्यक आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. जागतिक मंचांवर देशाच्या प्रतिष्ठेला मान्यता मिळविण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना एखादा खोडसाळपणादेखील किती हानिकारक ठरू शकतो, हे या प्रकारामुळे दिसून आले आहे. आता या प्रकारामुळे भविष्यात भारतीय तंत्रज्ञान अधिक प्रामाणिक व पारदर्शी राहील अशी अपेक्षा करता येईल. कारण या क्षेत्रातील कोणाकडूनही केले जाणारे कोणतेही दावे-प्रतिदावे सत्यतेच्या कठोर निकषावर तपासून घेतले जातील. एकदा तोंड पोळल्यावर पुढचा घोटही फुंकून पिण्याचा शहाणपणा शिकण्यासाठी ही लाजीरवाणी घटना काहीशी उपकारकच म्हणावी लागेल. अशा घटनांतून देशाची प्रतिष्ठाही पणाला लागलेली असते.
जगभर विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा नैतिक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक विकास कसा करता येईल आणि या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर विधायक कामासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी कसा केला जाईल, यावर धोरणात्मक संवाद साधण्यासाठीचा मंच म्हणून या परिषदेकडे पाहिले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वांना समान फायदे देणारा ठरावा व जबाबदारीने केला जावा, यावर परिषदेचा मुख्य भर आहे. यासाठी जगभरातील अनेक देश अनेक उपाय सुचवत आहेत, तर भारताने प्रत्यक्ष कृतीद्वारे यासाठी पुढाकार घेतला आहे. जगात हे तंत्रज्ञान भन्नाट वेगाने विकसित होत असले, तरी त्याचे लाभ सर्व देशांना सारख्याच प्रमाणात मिळत नाहीत.ai impact summit म्हणजेच या क्षेत्रातही मोठा जागतिक असमतोल निर्माण होत असून अनेक देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अनुशेषग्रस्त राहण्याची भीती आहे. अशा देशांना या क्षेत्राचे लाभ मिळावेत, विकसनशील देशांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुलभ करणे व नवोद्योगांना या क्षेत्राच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे ही भारताची भूमिका मान्य करून अनेक जागतिक नामवंत उद्योगांनी त्यामध्ये सहभागाची तयारी दर्शविली आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या कंपन्या भारतासोबत यासाठी काम करण्यास उत्सुक असल्याचे संकेत या परिषदेतून मिळाले आहेत, तर भारतातील लाखो नागरिकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विधायक वापरासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. या क्षेत्राच्या संभाव्य गैरवापरातून होणाèया हानीचे भय वाढत असताना व सुरक्षितता, जबाबदारीची जाणीव आणि पारदर्शकता अशा जाणिवा जपल्या जात असून भारताच्या या प्रयत्नांची जागतिक स्तरावर स्तुती होत असताना, चिनी बनावटीचे प्रदर्शन घडविणाèया या घटनेचा लाजीरवाणा प्रकार टाळावयास हवा होता, यात शंका नाही. याच गलगोटियास विद्यापीठास काही वर्षांपूर्वी, सर्वोत्तम खाजगी विद्यापीठ म्हणून गौरविण्यात आले होते, असे दिसते. त्याबाबत मतांतरेही आहेतच. आंतरराष्ट्रीय परिषदेतील त्यांच्या या कृतीमुळे या विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसही धक्का लागला आहे.