संवाद साधतील वाहने...

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
तंत्रवेध. .
 
 डॉ. दीपक शिकारपूर
 
ai vehicles सुमारे सात हजार वर्षांपूर्वी समुद्रावर चालू शकेल अशी नौका कुवैतमधील उत्खननात दिसून आली. प्राण्यांचा वापर करून प्रवास ही पद्धत तर अनेक शतकांपासून लोकप्रिय आहे. अजूनही अनेक दुर्गम भागात प्रचलित आहे. उद्याच्या तंत्रमय भविष्यात अनेक पैलू क्रांतिकारी पद्धतीने बदलणार आहेत. अनेक उपकरणे, प्रथा, प्रक्रिया कालबाह्य होतील. मग या सर्व उत्क्रांतीला वाहन कसे अपवाद ठरेल? 20 व्या शतकात संगणक जन्माला आले. पूर्वी खूप मोठ्या आकाराचे हे उपकरण स्वस्त, छोटे आणि शक्तिशाली होत गेले. हे तिन्ही प्रवाह एकाच वेळी कार्यरत होते. भौतिक जग आणि संगणकीय बिट, बाइटचे व्हर्च्युअल जग पूर्णपणे वेगळे होते. त्यांची एकमेकांत ढवळाढवळ नव्हती. उदा. वाहनाचे फ्युएल गेज फक्त इंधनाची पातळी सांगायचे आणि संपत आले की लाल दिवा लागायचा. हे चित्र 2010 नंतर बदलू लागले. 2026 नंतर त्यात आमूलाग्र बदल घडतील. सेलफोन, जीपीएस, इंटरनेट आणि नॅनो उर्फ सूक्ष्म तंत्रज्ञान यांच्या संगमातून एक अत्यंत वेगळ्याच प्रकारचे स्मार्ट जग लवकरच आपल्या आसपास दिसू लागणार आहे. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल; किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे. याला ‘स्मार्ट कॉम्प्युटिंग’ म्हटले जाते.
 
 

संवाद साधतील वाहने... 
 
 
भविष्यकाळात एक-दोन किलोमीटरवर वाहतूक कोंडीची लक्षणे दिसू लागताच गाडीतील जीपीएस यंत्रणा पर्यायी मार्ग शोधेल. तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, तसतशी आपली वाहनेही अधिक स्मार्ट होत चालली आहेत. उद्याचे वाहन केवळ चालवण्यापुरते मर्यादित न राहता, आपले साथीदार, मदतनीस आणि सुरक्षिततेचे संरक्षक ठरणार आहे. उद्याचे स्मार्ट वाहन हे पूर्णपणे इंटरनेटशी जोडलेले असेल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि सेन्सर टेक्नॉलॉजी यांचा वापर असेल. याव्यतिरिक्त स्मार्ट वाहने प्रदूषणविरहित असतील. ती सौर किंवा विद्युत ऊर्जेवर चालतील. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि हवामान बदलावरही सकारात्मक परिणाम होईल. उद्याचे स्मार्ट वाहन हे अधिक आरामदायक, कार्यक्षम आणि सुरक्षित असेल. ते अधिक वैयक्तिकृत आणि कनेक्टेड असेल. अधिक लवचीक आणि अत्याधुनिक प्रवास पर्याय प्रदान करेल. उद्याचे वाहन रचतेच्या बाबतीतही बदलत आहे. त्यात सुटे हलते भाग कमी होऊन सिलिकॉन चिप्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, लिथियम बॅटरी असे अवयव असतील. चालकासमोरचा डॅशबोर्ड अधिकाधिक स्मार्ट होऊन चालकाला बॅटरी किती चार्ज आहे, जवळ चार्जिंग स्टेशन कुठे आहे, ट्रॅफिक जाम व वाहतुकीच्या मार्गाचा स्मार्ट सल्ला इत्यादीची इत्थंभूत माहिती देईल.
 
येत्या काळात वाहने अधिक प्रगत सस्पेन्शन आणि सीटिंग सिस्टिमसह येतील, जी अधिक आरामदायक प्रवास अनुभव प्रदान करतील. त्यात अधिक कार्यक्षम इंजिन असेल आणि ऊर्जा-सक्षम घटकांसह जास्त मायलेज आणि कमी उत्सर्जन देईल. इथे इलेक्ट्रिक, हायब्रीड असे अनेक घटक समाविष्ट असतील. स्मार्ट वाहने इंटरनेट आणि इतर उपकरणांशी सतत जोडलेली राहतील. यामुळे त्यांना रिअल टाईम वाहतूक माहिती, हवामानाचा अंदाज आणि इतर उपयुक्त माहिती मिळत राहील. उद्याचे स्मार्ट वाहन अधिक सुरक्षित असेल. स्वयंचलित ब्रेकिंग, लेन-बदल करण्यात मदत आणि अंधारात दृष्टी या बाबतीत ते चुणूकदार ठरेल. चालक गाडी ठीक चालवत नसेल तर ते अनेक प्रकारे त्याला सूचना देईल. गजर, झटका, समोरील वाहन वेगात उलट येत असेल तर आपोआप स्टिअरिंग वळवणे, अनेक निकटवर्तीयांंना आपत्कालीन संदेश पाठविणे आदी गोष्टी करेल. उद्याचे स्मार्ट वाहन अधिक वैयक्तिकृत असतील. ते अधिक वैयक्तिकृत इंटीरियर आणि एक्सटीरियर डिझाईनसह उपलब्ध होईल, जे चालक आणि प्रवाशांच्या आवडीनिवडी पूर्ण करेल. प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्यामुळे तिच्या वाहनाबद्दलच्या गरजा वेगळ्या असतात. उद्याचे स्मार्ट डिस्प्ले तंत्रज्ञान तुम्हाला स्मार्टफोन स्क्रीन समोर दाखवेल आणि ध्वनी सहायक (व्हॉईस असिस्टंट) तुम्हाला वाहन चालवत असताना संदेश ऐकवेल. त्यातील एआय टूल आपोआप काही निर्णय घेईल. वाहनातील मनोरंजन प्रणाली अधिक प्रगत असेल आणि प्रवाशांना चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे किंवा ऑनलाईन काम करणे शक्य होईल.
 
येत्या काळात आपण गाडीमध्ये मागील बाजूला बसलो असल्यास समोरील सीट हे वर्क स्टेशन बनेल. त्यामुळे मनोरंजन, संगणकाचा वापर अशा अनेक गोष्टी शक्य होतील. वाहने एकमेकांशी आणि रस्त्यावरील पायाभूत सुविधांशी संवाद साधू शकतील. यामुळे सुरक्षितता वाढेल आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.ai vehicles यामध्ये अजून एक प्रवाह असेल तो स्वयंचलित वाहनाचा. सध्या ते प्रगत देशात प्रायोगिक स्तरावर प्रचलित आहे, पण भारतात त्याच्या अनेक समस्या आहेत. सतत बदलणारे रस्ते (आजचा नो एन्ट्री पॉईंट उद्याचा वन-वे असू शकतो), कधीही कुठूनही वाहन अथवा प्राणी प्रकट होऊ शकते, अंधारात खड्डे असू शकतात. पुढील काही वर्षांमध्ये त्यावरही उपाय सापडतील, पण दुर्गम, असुरक्षित प्रदेशात स्वयंचलित तंत्र नक्कीच सोयीस्कर असेल. अशा वाहनांमुळे अपघातात घट, इंधनाचा कमी वापर आणि वेळेची बचत होणार आहे. इलेक्ट्रिक वाहने आधुनिक युगातील पर्यावरणपूरक वाहतूक स्रोत म्हणून उदयास आली आहेत. या वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेलऐवजी विद्युत ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचेे नुकसानही कमी होते. इलेक्ट्रिक वाहन ज्वलन इंजिनाऐवजी इलेक्ट्रिक मोटरवर चालते. त्यामध्ये मोठ्या रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये (किंवा इलेक्ट्रिक सेलच्या पॅकमध्ये) वीज साठवली जाते. इलेक्ट्रिक वाहने खूपच कमी आवाज करतात, उच्च प्रवेग आणि टॉर्क त्यांना आणखी आकर्षक बनवते. महत्त्वाचे म्हणजे त्यांना व्यावहारिकदृष्ट्या कोणत्याही देखभालीची आवश्यकता नसते.
 
गेल्या दशकापासून देशामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांवरील संशोधनाला गती मिळाली आहे. या वाहनांचा बोलबाला इलेक्ट्रिक कार्सइतका नसला, तरी बीएमडब्ल्यू आणि स्टोलांटिस या मोठ्या कंपन्यांनी याबाबतच्या संशोधन आणि विकास कार्यक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याने या क्षेत्राकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. अनेक देशांनी आपापल्या वाहन उत्पादकांवर कमीत कमी धूर सोडून पर्यावरणाची हानी शक्य तितकी टाळणारी इंजिने (व इंधनेही) शोधण्याचे, बनवण्याचे आणि वापरण्याचे बंधन आता घातले आहे. त्यामुळे वाहन उद्योगाच्या पारंपरिक चित्रात आणि एकंदर रचनेमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. हायड्रोजन कार्स हे त्यातलेच एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही हायड्रोजन कार चालते कशी हे आपण थोडक्यात वाचू. इथे हायड्रोजन पेट्रोलप्रमाणे, थेट जाळला जात नाही तर त्यातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विजेमध्ये केले जाते. या विजेवर गाडीची चाके फिरवली जातात. मुख्य म्हणजे या वाहनाच्या एक्झॉस्ट पाईपमधून धूर नाही तर चक्क पाणी बाहेर येते; परिणामी प्रदूषण शून्य! हायड्रोजन तीन प्रकारे मिळतो. पेट्रोलियमच्या उत्पादन प्रक्रियेतून, कोळशापासून आणि पाणी व सेंद्रिय कचèयातून. ‘ग्रीन’ म्हणजेच पर्यावरणस्नेही असल्याने या तिसऱ्या प्रकारच्या हायड्रोजनचा वापर या वाहनांसाठी केला जातो. या सर्व नवसंशोधनांकडे पाहताना कोणतेही एक विशिष्ट तंत्रज्ञानच श्रेष्ठ मानून त्याचाच वापर करण्याचा आग्रह धरण्यापेक्षा, सर्वोत्तम विविध तंत्रांचे एकत्रीकरण करून पर्यावरण रक्षणाचा अंतिम हेतू साध्य करणे महत्त्वाचे आहे, असे म्हणता येईल.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)