आणखी दोन आरोपींना अटक, एकूण आरोपींची संख्या 5 वर

20 Feb 2026 18:52:04
बाळ विक्री प्रकरण
भंडारा,
Bhandara baby sale case  बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याला 19 रोजी भंडारा पोलिसांनी अटक केल्यानंतर आज 20 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच प्रकरणात आणखी दोन आरोपींना आज पोलिसांनी अटक केली असून आता आरोपींची संख्या 5 वर पोहचली आहे. उपचाराच्या नावाखाली एका चिमूकलीला नागपूरला पाठवीत असल्याचे सांगून मध्यस्थ्यांच्या मदतीने तिची तीन लाखात विक्री करण्याचे प्रकरण 3 फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणी गोंदिया न्यू बालाजी क्लिनिकचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील दोन आरोपी यापूर्वी पकडल्या गेले.
 
 

Bhandara baby sale case 
 
मुख्य आरोपी बाजपेयी यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. त्याला 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आज 20 रोजी बाजपेयी याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणातील आणखी सत्य बाहेर येण्याच्या दृष्टीने पोलिसांनी बाजपेयी याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान 23 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे असल्याचे तपास अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांनी सांगितले. या प्रकरणातील गोंदिया निवासी पोर्णिमा रमेश धुर्वे आणि उमेशसिंग गहलोत या दोन आरोपींना आज 20 रोजी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आता बाळ विक्री प्रकरणात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या पाच वर पोहोचली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने पोलिसांकडून सर्वच दृष्टिकोनातून याचा तपास होत असून आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाची विक्री झाली होती. ते बाळही लवकरच हस्तगत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Powered By Sangraha 9.0