गुरुग्राम,
blinkit saves life ब्लिंकिट ने गुरुग्राममध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केलेली रुग्णवाहिका सेवा एका ९० वर्षांच्या आजीसाठी जीवनरक्षक ठरली. १० मिनिटांत आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) ॲम्ब्युलन्स सेवा ऑक्सिजन सिलेंडर, स्ट्रेचर, मॉनिटर्स, AED यांसारख्या अत्यावश्यक उपकरणांनी सज्ज असून प्रशिक्षित पॅरामेडिक कर्मचारी त्यात तैनात आहेत.
अलीकडेच गुरुग्राममधील एका रहिवाशाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्याने लिहिले की, १४ फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या ९० वर्षांच्या आजीला अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. कुटुंबीय घाबरलेले असताना त्यांनी तत्काळ ब्लिंकिटची रुग्णवाहिका सेवा मागवली. काही मिनिटांतच पॅरामेडिकचा फोन आला आणि त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
सुमारे ७ ते १० मिनिटांत टीम घरी पोहोचली. आजींची ऑक्सिजन पातळी ८१ पर्यंत खाली आली होती. पॅरामेडिक्सने तातडीने ऑक्सिजन देत तिची प्रकृती स्थिर केली. काही मिनिटांतच ऑक्सिजन पातळी ९० च्या पुढे गेली. वरिष्ठ डॉक्टरांशी सातत्याने संपर्क ठेवत तिला जवळच्या रुग्णालयात हलवण्यापूर्वी तिची प्रकृती नियंत्रणात असल्याची खात्री करण्यात आली.
विशेष म्हणजे, ही सेवा मोफत देण्यात आली होती. कुटुंबीयांनी पॅरामेडिक टीमचे त्वरित प्रतिसाद, व्यावसायिकता आणि करुणेबद्दल मनापासून आभार मानले.
या पोस्टनंतर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यावरही ब्लिंकिटची रुग्णवाहिका वेळेत पोहोचली होती.blinkit saves life दुसऱ्या एका वैद्यकीय व्यावसायिकाने लिहिले की, तो जवळपास दररोज ब्लिंकिट ॲम्ब्युलन्समधून आलेल्या रुग्णांवर उपचार करतो आणि त्यांची सेवा पद्धत प्रभावी आहे. आणखी एका वापरकर्त्याने आपल्या बहिणीच्या आपत्कालीन प्रसंगी मिळालेल्या तत्पर मदतीबद्दल कौतुक केले. गुरुग्राममध्ये सुरू झालेल्या या पायलट प्रोजेक्टमुळे तातडीच्या वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.