मुंबई.
Gokul announces milk price hike गोकूळ दूध महासंघाने म्हशी आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याअनुसार, म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची तर गायीच्या दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५२ रुपये ५० पैशांमध्ये खरेदी केले जाणारे म्हशीचे दूध आता ५३ रुपये ५० पैशांमध्ये खरेदी केले जाईल. तसेच, ३४ रुपयांमध्ये खरेदी होणारे गायीचे दूध आता ३६ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले जाईल.
हा निर्णय शुक्रवारी गोकूळ दूध महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, उत्पादकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने दूध खरेदी दर वाढविण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. यासोबतच, दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करून ते ७० रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे, जे आधी ६८ रुपये दराने विकले जात असे. नवीन दर आज शुक्रवारी संध्याकाळपासून लागू होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी घेतलेला हा निर्णय ग्राहकांसाठी महागाईचा फटका ठरेल, असे सांगितले जात आहे. गोकूळच्या या निर्णयाने दूध उत्पादकांना दिलासा मिळाला असून, या वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.