मोरेश्वर बडगे
rohit pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. अजितदादा राष्ट्रवादीचे सुप्रीमो होते, राज्याच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होते. त्यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सत्ताधारी राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण, हाही प्रश्न उभा झाला. अशा हवेत अचानक दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला. अजितदादांची अंतिम इच्छा या स्वरूपात विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खुद्द अजित पवार यांच्या तब्बल 12 बैठका झाल्या होत्या, असे सांगितले गेले. मात्र, अजितदादांनी आपल्या हयातीत विलीनीकरणाचा विषय कधीही छेडला नव्हता.

मग या निमित्ताने अजितदादांचे काका म्हणजे शरद पवार काही वेगळा नॅरेटिव्ह सेट करू पाहत होते का? विलीनीकरण कोणाचे आणि कोणत्या पक्षात? हाही प्रश्न होता. दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण करून अजितदादांच्या राष्ट्रवादीवर ताबा मिळण्यिाचा डाव होता का? मात्र, अजितदादांच्या गटाने वेगवान हालचाली केल्या. त्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीला हात चोळत बसावे लागले. अजितदादांच्या निधनाच्या चौथ्याच दिवशी अजितदादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देवविण्यात आली. त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या बनल्या. आता तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत. त्यामुळे दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय मागे पडला आहे.
सत्तेच्या सोबत जायचे की नाही या मुद्यावर राष्ट्रवादीत फूट पडली होती. अजित पवार यांनी बंड केले. आपले आमदार घेऊन अजितदादा महायुती सरकारमध्ये सामील झाले होते. अलिकडे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काका-पुतणे जवळ आले होते. विधानसभा निवडणुकीत अजितदादांना 41 जागा जिंकता आल्या तर शरद पवारांचा पक्ष 10 जागांवर थांबला. स्वतःच्या ताकदीचा अंदाज आल्याने शरद पवारांनी पुतण्याशी जुळवून घ्यायचे ठरवले होते. विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या काय? हा वादाचा विषय असला, तरी या चर्चा मीडियामध्ये नक्कीच चालू होत्या. त्या प्रमाणे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार होते. जयंत पाटील अर्थमंत्री तर रोहित पवार राज्यात मंत्री होणार होते. भाजपाने रोहित यांच्या नावाला विरोध केला होता, अशी माहिती आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हेही दोघे विलीनीकरणाच्या विरोधात होते. आता तब्बल तीन वर्षे कुठल्याही निवडणुका नाहीत. इतका काळ रिकामे राहावे लागेल या कल्पनेनेच राष्ट्रवादीतल्या अनेकांचा रक्तदाब वाढला आहे. आपण बारामतीचे तिसरे वारसदार असताना आपला विचार होत नाही, हे पाहून रोहित पवार गडबडले असणार. पण करणार काय? सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीनंतर पार्थ आणि जय या बंधूंनी सूत्रं हाती घेतली. हे दोघे आईचे राजकारण सांभाळताना इतरांना आसपास फिरकू देत नाहीत. तोंडाला आलेला घास हिसकावला गेला, अशी भावना रोहित पवार यांची झाली असणार. त्यातून ते आज शंकासुर झालेले दिसतात. अजितदादांच्या विमानाची दुर्घटना हा अपघात होता, असे त्यांचे आजोबा शरद पवारांनी सुरुवातीलाच सांगितले असतानाही रोहित पवार सारख्या शंका उपस्थित करीत आहेत. आपण अपघात सांगितलं असताना नातू दुसरेच काही भलते सलते बोलतो आहे, हे शरद पवारांना खटकत का नाही? हे कोडे आहे. त्यांनी आपल्या नातवाला झापल्याचं ऐकिवात नाही. मुळात शरद पवार जे बोलतात ते त्यांना बोलायचे नसते हा अनेकांचा अनुभव आहे. मग आजोबानेच वेगळे बोलायला रोहित पवार यांना पुढे केले नसेल, याची खात्री नाही. रोहित पवारांना तर ‘शरद पवार’ व्हायचं आहे. या आधी पार्थलाही त्यांनी छळले होते. आजोबा बोलल्यानंतरही रोहित पवारांनी पत्रपरिषद आणि गौप्यस्फोटांचा सपाटा लावला आहे. हा अपघात कसा घातपात आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. सुनेत्रा वहिनींना बदनाम करता येत नाही म्हणून मग इतरांवर शरसंधान सुरू आहे, ते सुनील तटकरेंना टार्गेट करताहेत. ‘फाईल उशिराने आल्याने अजितदादांना दुसèया दिवशी सकाळी विमानाने बारामतीला जावे लागले. ती फाईल प्रफुल्ल पटेल यांची होती’ असेही ते सांगतात. विलीनीकरण होत नाही तर मग समोरच्याला ब्लॅकमेल करायचं. दबाव आणायचा. रोहित पवार हा आपल्या आजोबांचा ‘बोलका बाहुला’ आहे का? कारण शरद पवार काहीही करू शकतात.
या विमान अपघाताला महिनाही व्हायचा आहे. विमानाचा अपघात आहे. महत्त्वाचा माणूस त्यात मारला गेला आहे. विमान अपघाताची चौकशी, तपास हा सारा प्रकार गुंतागुंतीचा असतो. दुसèयांदा आमदार झालेल्या रोहित पवारांना हे कळत नसेल अशातला भाग नाही. तरीही ते उठसूट आरोप करीत आहेत. त्यांना खाज सुटली काय की ते स्वतःचे उपद्रवमूल्य सिद्ध करू पाहत आहेत? शंकासुराच्या या उतावीळपणाला काय म्हणायचं ? नागरी उड्डयन मंत्रालय तसेच महाराष्ट्राची सीआयडी या अपघाताची चौकशी करीत आहेत. सुरुवातीला गप्प असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मागणी मान्यही करतील. त्या प्रमाणे तपास होईल. पण रोहित पवारांना कशाची घाई झाली आहे ते कळायला मार्ग नाही. अपघातानंतर लागलेल्या आगीत या विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे. त्यामुळे आतल्या वैमानिकांचं शेवटचं संभाषण मिळवणं जड जात आहे. कुठल्याही विमान अपघातात ही समस्या येते. ती दुरुस्त केली जाते.rohit pawar रोहित म्हणतात त्या प्रमाणे तो घातपात असेल तर तो कशाने झाला? कोणी केला? कशासाठी केला? हे प्रश्न उपस्थित होतात. ‘विमान मुद्दाम आदळलं’ असं रोहित म्हणतात. कुठलाही पायलट असं विमान आदळू शकतो का? विमानात दोन टँक भरून इंधन होतं, असे ते म्हणतात. विमानात इंधन भरून ठेवायची टँक घ्यायला ती काय ‘वडापाव’ची गाडी आहे? विमान कंपनीकडेही ते बोट दाखवतात. मग आजपर्यंत त्यांचे किती अपघात झाले? ते सारे तांत्रिक मुद्दे तपासावे लागतील. त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. पण वाट पाहायची सोडून रोहित पवार वारंवार अकलेचे तारे तोडताहेत ते भयंकर आहे. मला त्यांचे पॉवर प्रेझेंटेशन कव्हर करणाèया मीडियाची कीव येते. एकही पत्रकार उलट प्रश्न करीत नाही. रोहित जे बोलतात ते श्रद्धा भावनेने ऐकून घेतात. रोहित काहीही बोलतील. पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकायला पाहिजे ना. सध्या जे सुरू आहे ते बेताल सुरू आहे. बिनबुडाचे आणि निरर्थक सुरू आहे. शरद पवारही हेच करायचे. मुंबईमध्ये 11 बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा शरद पवारांनी काय थाप मारली होती ते आठवा. शरद पवारांच्या थापांना कधी ‘गुगली’ तर कधी ‘भाकरी फिरवली’ असे सांगितले गेले. आजोबाने केले तेच सध्या नातू करतो आहे. खरे तर शरद पवारांनी आता रिटायर व्हायला पाहिजे. राजरोस थापेबाजीचा त्यांचा वारसा चालवायला नातू आला आहे. लवकरच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यात अजितदादांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्ताव येणार आहे. सीबीआय चौकशी जाहीर होणार असेल तर चर्चा काय करणार? मग रोहित पवार यांचे तोंड गप्प करण्यासाठी सीबीआय चौकशी लावली काय? सध्या सारे संशयाच्या घेèयात आहे. सुनेत्रा वहिनींच्या हातात गेम आहे. सारे बोलताहेत. पण त्या गप्प आहेत. ज्या दिवशी सुनेत्रा वहिनी बोलायला लागतील तेव्हा भूकंप होईल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)