कारल्याची भाजी केल्याच्या रागातून आईची हत्या

20 Feb 2026 19:42:51
मूल, 
Mother murdered over bitter gourd कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका मुलाने आपल्या जन्मादात्या आईची हत्या केली. ही धक्कादायक घटना तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. जगदीश दशरथ पेटकुले (36) असे आरोपीचे नाव असून, मृत महिलेचे नाव सुमित्रा दशरथ पेटकुले (65 ) असे आहे. आरोपी जगदीश याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे तो आईसोबतच राहत होता. गुरुवारी कारल्याची भाजी का बनवली म्हणून त्याने आईशी वाद घातला. या वादाने क्षणातच उग्र रुप धारण केले.
 
 

hatya 
 
रागाच्या भरात आणि दारुच्या नशेत असलेल्या जगदीशने आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपी दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या व्यसनामुळे त्याचा स्वभाव आक्रमक बनल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जगदीश पेटकुले याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0