तिवसा,
Murder near Bharwadi bridge भारवाडी येथील वर्धा नदीच्या पुलाजवळ चाकूने भोसकून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमल सतीश अग्रावत (वय ४१ वर्षे) असे मृतकाचे नाव असून तो मूळचा गांधीग्राम, राजकोट (गुजरात) येथील रहिवासी आहे. मृतक व त्याच्यासोबत असलेला संशयित आरोपी हे दोघे नागपूर येथून राष्ट्रीय महामार्गाने तिवसा तालुक्यात आले होते. पहाटे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान त्यांनी भारवाडी—वर्धा पुलाजवळील आयआरबी कंपनीच्या ट्रक ले-बाय येथे विश्रांतीसाठी थांबा घेतला होता. दरम्यान, सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ले-बायचे पहारेकरी जानराव ठाकरे हे चहा घेण्यासाठी बाहेर गेले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर ते परत आल्यानंतर त्यांना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली दिसली, तर त्याच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याचे आढळून आले. घटनास्थळी एक रेसर ड्यूक दुचाकी आणि एक बॅग संशयास्पद अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असता मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये झालेल्या तीव्र वादातून आरोपीने चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत पुरावे संकलित केले. दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा सखोल तपास सुरू असून वैयक्तिक वाद, आर्थिक कारण किंवा अन्य कोणता हेतू होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक व न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या पथकाने भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे तिवसा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून महामार्ग परिसरातील सुरक्षिततेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.