वेध.....
सोनाली पवन ठेंगडी
parents counseled सध्या परीक्षांचा हंगाम आहे. बारावीची परीक्षा सुरू आहेच आणि आता दहावीची सुरू होते आहे. आता या परीक्षांना अर्थ उरला नाही, प्रवेश परीक्षांवरच सगळा भर असतो असे कोणीही म्हणत असले, तरी पूर्वापार बोर्डाच्या परीक्षांना असलेले महत्त्व अबाधित आहे. त्यातही दहावीची परीक्षा तर विद्यार्थ्यांच्या जीवनातील मोठा टप्पा आहे. यानंतरच त्यांच्या जीवनाची दिशा खऱ्या अर्थाने ठरते. त्यामुळे मग दहावी कधी, असे कोणी विचारले की, त्या विद्यार्थ्याला जेवढे दडपण येणार नाही तेवढा ताण पालकांच्या चेहऱ्यावर दिसतो.
विद्यार्थ्यांच्या अतिताणाची परिणती आत्महत्येत होण्याच्या घटना लक्षात घेता मागील काही वर्षांपासून बोर्डाच्या आणि शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचे कार्य हाती घेण्यात आले. ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे समुपदेशक आणि शिक्षक सतत त्यांना समजावत असतात. अभ्यासासोबतच हे आवश्यक आहेच. पण, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक नेमताना पालकांचाही थोडा विचार व्हायला हवा. कारण बहुतांश ठिकाणी मुलांच्या तणावाचे कारण अभ्यासाइतकेच पालकांकडून येणारा दबाव हेही असल्याचे लक्षात येईल.
काही घरांमध्ये तर मुलगा किंवा मुलगी आठव्या, नवव्या वर्गात गेल्यापासूनच लष्करी शिस्तीचा अवलंब केला जातो. (काही लोक याला घरात मार्शल लॉ लागला असेही म्हणतात) सर्वप्रथम गारपीट येते ती टीव्हीवर. केबल बंद करा..झाला. नंतर ट्यूशन कुठे कुठे लावायची, याचे काथ्याकूट सुरू होते. विशेष म्हणजे, असे सर्व करणारे पालक एकदाही शाळेत जाऊन शिक्षक किंवा मुख्याध्यापकांशी बोलण्याची तसदी घेत नाहीत. वास्तविक, या नाजूक वळणावर एकटे शिक्षक किंवा एकटे पालक काहीच करू शकत नाही. दोघांनी मिळून विद्यार्थ्यांचे हे वळण सोपे करायचे असते. म्हणून नवव्या वर्गापासूनच पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षकांची भेट घेऊन त्याच्याविषयी सविस्तर बोलले पाहिजे. त्याच्या दोषांचे भांडवल न करता किंवा त्याविषयी त्याला टचटच बोलून टोचण्यापेक्षा त्याच्या गुणांच्या उत्कर्षाकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे त्याचा कोणता विषय आवडीचा आहे किंवा पक्का आहे, हे जाणून घ्यावे. पक्का विषय कळला की कच्चा विषय आपोआपच कळतो. असे झाले की, त्याच्या त्रुटींना भरून काढण्याचे काम आपोआपच सुरू होते.
पालकांनी शिक्षकांशी चांगला संवाद ठेवण्यासोबतच मुलांशीही बोलत राहिले पाहिजे. नेहमीच अभ्यासाशिवाय दुसरे काही बोलायचेच नाही, हा खाक्या चुकीचा आहे. उलट, मुलांना विश्वासात घेण्यासाठी त्याच्या आवडीच्या चांगल्या विषयावर बोलावे. म्हणजे त्याला कळू लागेल की पालक आपल्याशी चांगले बोलू शकतात. एकदा मुलांना लक्षात आले की आपण पालकांशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो, तिथे पालकांनी अर्धी लढाई जिंकली असे समजावे. कारण मुलांमध्ये पालकांविषयी विश्वास निर्माण होणे सर्वाधिक गरजेचे असते. दुर्दैवाने सध्या याचाच अभाव दिसतो.
‘अरे किती महत्त्वाचे वर्ष आहे तुझे,’ असे मुलांशी बोलल्याने त्याचा ताण वाढतोच. शिवाय यातून पालकांचाही ताण दिसून येतो. मुळात, या सर्व समस्यांचे मूळ एकच आहे की, बोर्डाचे निकाल पालकांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. अमक्याच्या मुलाला किंवा मुलीला 90 टक्क्यांच्या वर मिळाले, हा विचार त्यांच्या डोक्यातून जात नाही. यावर उपाय एकच आहे की, पालकांनी आपले मूल खरंच 90 टक्के किंवा त्याच्या आसपासची टक्केवारी मिळवू शकेल का, याचे आकलन करून घ्यावे. आपला मुलगा किंवा मुलगी सर्वसाधारण विद्यार्थी आहेत, ही वास्तविकता प्रथम पालकांनी स्वीकारली पाहिजे. मग तिथून पुढे त्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावता येईल, हे शिक्षकांसोबत बोलून ठरवावे. पण, मुलांचे सर्वसाधारणपण स्वीकारताना त्यांना यासाठी कधीही टोमणे मारले जाऊ नये. कारण दहावी-बारावीचे निकाल हेच आयुष्य नाही, यशस्वी जीवनाचे अंतिम सूत्र नाही, हे आता सर्वांना कळले आहे. फक्त आपल्या अपत्याची वेळ आली की पालकांना बरेचदा ते वळतच नाही.parents counseled मग तिथेच सगळी समस्या उद्भवते. शिवाय नववी-दहावीचे वर्ष आल्यानंतरच झोपेतून जागे झाल्यासारखे पालक मुलांच्या मागे लागतात. हे चुकीचे आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये टीव्ही, मोबाईल, अभ्यास, खेळ, संस्कारक्षम गोष्टी यांची योग्य ती शिस्त बाणवली पाहिजे. असे झाले तरच मुलांच्या बोर्डाच्या वर्षांमध्ये पालकांना त्यांना हाताळणे जड जाणार नाही. म्हणून आता गरज विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्याही समुपदेशनाची आहे, असे म्हणावे लागते.
7755938822