हॉटेल बुकिंगच्या आमिषाने ७.२३ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा डाव

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
पुणे,
Shivajinagar police station Pune ऑनलाइन हॉटेल आरक्षणाच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील एका ५३ वर्षीय महिलेची तब्बल ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
 

Pune cyber crime, Pune hotel booking fraud, Shivajinagar police station Pune 
तक्रारदार महिला शिवाजीनगर परिसरात राहणारी असून, काही अनोळखी व्यक्तींनी तिच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला नामांकित ऑनलाइन हॉटेल बुकिंग कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले. संबंधित महिलेने नाशिकमधील एका हॉटेलमध्ये खोली आरक्षित केल्याचे सांगून आरक्षणाची तारीख बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि अधिकृत प्रक्रियेचा आभास निर्माण केला.यानंतर आरोपींनी महिलेचा मोबाइल क्रमांक व इतर तपशील मिळवून तो तिच्या बँक खात्याशी संलग्न असल्याची माहिती घेतली. तांत्रिक क्लृप्त्या वापरून तिच्या मोबाइलवर प्रवेश मिळवत त्यांनी तिच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ७ लाख २३ हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले. व्यवहारांची माहिती लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून संबंधित बँक खात्यांचे तपशील आणि व्यवहारांचा मागोवा घेण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारांकडून सोशल इंजिनीअरिंग तंत्राचा वापर करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींशी फोन, संदेश किंवा व्हिडिओ कॉलवरून कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक किंवा अ‍ॅप डाउनलोड टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये अधिक जागरूकता बाळगणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.