नवी दिल्ली,
italian-players-mock-india टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी इटलीच्या क्रिकेटपटूंनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली आहे. ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेड क्रिकेटर’ या पॉडकास्टमध्ये इटलीचे मोस्का बंधू जस्टिन आणि अँथनी तसेच मॅनेटी बंधू बेन आणि हॅरी सहभागी झाले होते. ५ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आलेल्या सुमारे ३० मिनिटांच्या या व्हिडिओतील एका भागाने विशेष लक्ष वेधले असून तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या चर्चेदरम्यान इटलीचा कर्णधार हॅरी मॅनेटी संघाच्या परदेश दौऱ्यांतील अनुभवांबद्दल बोलत होता. क्रिकेट स्पर्धांच्या काळात संघातील खेळाडू कधीमधी पबमध्ये जाऊन वेळ घालवतात, असे तो हलक्याफुलक्या अंदाजात सांगत होता. फिनलंडमधील एका जुन्या दौऱ्याची आठवण काढताना त्याने भारतातील ‘नळाच्या पाण्याचा’ उल्लेख केला. italian-players-mock-india त्यानंतर स्टुडिओत उपस्थित असलेले इतर खेळाडू हसू लागले. हॅरीच्या या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी या वक्तव्याला केवळ विनोदी संदर्भ असल्याचे म्हटले, तर अनेकांनी ते भारतातील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थांबाबत अप्रत्यक्ष टीका असल्याचे मानले. विशेषतः टी-२० विश्वचषक भारतात होणार असल्याने या टिप्पण्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र संबंधित खेळाडूंनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी कोणतीही औपचारिक तक्रार किंवा थेट आरोप केलेले नाहीत.
सौजन्य : सोशल मीडिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही या प्रकरणी कोणतीही कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे, कारण हे वक्तव्य एका अनौपचारिक आणि संवादात्मक कार्यक्रमादरम्यान करण्यात आले होते. दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी एका ‘एक्स’ वापरकर्त्याने हा व्हिडिओ संदर्भाशिवाय शेअर केल्यानंतर वादाला अधिक उधाण आले. भारतीय चाहत्यांमध्ये विशेषतः या क्लिपवर तीव्र चर्चा सुरू असून काहींनी आयोजन व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.