नागपूर,
Traffic police on alert माेबाईल कानाला लावून वाहन चालविल्यामुळे लक्ष विचलित हाेऊन अपघात हाेण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे नागपूर वाहतूक पाेलिसांनी विशेष अभियान राबवित गेल्या दाेन वर्षांत 14 हजार 644 वाहनचालकांना दणका दिला आहे. माेबाईलवर बाेलताना वाहन चालविणा-यांकडून जवळपास दीड काेटींवर दंडसुद्धा पाेलिसांनी वसूल केला आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. जवळपास 22 लाखांपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर धावतात. वाहन चालविताना नियमांचे तंताेतंत पालन व्हावे म्हणून वाहतूक पाेलिस आटाेकाट प्रयत्न करीत असतात. मात्र, वाहनधारक नियम पाळत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ हाेत आहे.

वाहन चालविताना सर्वांनी नियमांचे पालन करावे, जेणेकरुन अपघात आणि वाहतूक काेंडी हाेणार नाही. यासाठी वाहतूक पाेलिस कायदेशिर कारवाई करुन दंडही ठाेठावतात. तरीदेखील वाहनधारकांना कायद्याची भीती नसल्याचे कारवाईतून दिसून येते. काही दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक थेट माेबाइलचा वापर करतात. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. यामुळे नवीन केंद्रीय माेटार वाहन कायदा लागू केला आहे. राज्यात लागू केलेल्या नवीन माेटार वाहन कायद्यामध्ये दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार दुचाकीस्वार माेबाइलवर बाेलत असेल, तर 1 हजार रुपये आणि चारचाकी वाहनचालकांना 2 हजारांचा दंड आकारला जाताे; तसेच ठराविक कालावधीत तिस-यांदा गुन्हा झाला, तर थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तरीदेखील वाहनधारकांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे कारवाईतून दिसून येते. नागपुरात 2024 मध्ये कानाला फोन लावून वाहन चालविणा-या 9 हजार 255 वाहनचालकांवर वाहतूक पाेलिसांनी दंडात्मक कारवाई केली हाेती. तर वर्ष 2025 मध्ये 5 हजार 389 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली हाेती. गेल्या दाेन वर्षांत 14 हजार 644 वाहनचालकांना वाहतूक पाेलिसांनी दंडात्मक दणका दिला आहे.
तरुणी-महिलांचा सर्वाधिक समावेश
कानाला माेबाईल लावून दुचाकी आणि कार चालविणा-यांमध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन तरुणी, महिलांचा माेठ्या प्रमाणात समावेश आहे. वाहन चालविताना माेबाईलवर बाेलत असल्यामुळे लक्ष विचलित हाेते. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता सर्वाधिक असते. कानाला फोन लावल्यानंतर मान वाकडी करुन किंवा हेल्मेटमध्ये माेबाईल खाेचून बाेलत-बाेलत वाहन चालविणा-यां महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
बाईक चालवताना व्हाॅट्सअॅपही चेक
काही वाहनचालकाच्या एका हातात माेबाईल तर दुस-या हातात वाहनाचे हॅण्डल असते. तसेच गर्दीतील रस्त्यावरही व्हाॅट्सअॅपही चेक करतात. शहरात वाहनांची वदर्ळ वाढली आहे. वाहन चालविताना थाेडीजरी नजरचूक झाली तर अपघाताचा धाेका आहे. तरीही या वाहनचालकांची ही जीवघेणी कसरत वाहनचालक करताना दिसतात. अपघाताचा धाेका असतानाही व्हाॅट्सअॅप चेक करण्याला वाहनचालक महत्व देतात. हा प्रकार सर्रास दिसून येत आहे.
वाहन चालविताना माेबाईलवर बाेलणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. कानाला माेबाईल लावून वाहन चालविताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पाेलिस आटाेकाट प्रयत्न करीत असून कुणीही वाहन चालविताना माेबाईलवर बाेलू नये.
- लाेहित मतानी (पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)