पुण्यात पहिल्यांदाच खास क्रिकेट स्पर्धा! दिव्यांग खेळाडू गाजवणार मैदान

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
पुणे
Pune national tournament क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी नॅशनल व्हीलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप यंदा प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणारी ही स्पर्धा १९ आणि २० फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियम येथे पार पडणार आहे.
 

wheelchair cricket championship, Pune national tournament 
या स्पर्धेत महाराष्ट्र संघासोबत गुजरात आणि मुंबई संघांचा सहभाग असून, व्हीलचेअर क्रिकेट इंडिया (Wheelchair Cricket India) आणि महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभरात सुरू असलेल्या झोनल सामन्यांपैकी काही महत्त्वाचे सामने पुण्यात होत असून ही नॅशनल चॅम्पियनशिप वेस्ट झोनसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी उदयपूर, गोवा आणि ओडिशा येथे या स्पर्धांचे आयोजन झाले होते, मात्र पुण्यात प्रथमच ही राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धेतील सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिकेटपटू असून त्यांचे वय २१ ते ३७ वर्षांच्या दरम्यान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिलेक्शन ट्रायल्स ही नियमित क्रिकेटप्रमाणे घेतल्या जातात आणि खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाते. नॉर्मल क्रिकेट आणि व्हीलचेअर क्रिकेटमध्ये फारसा फरक नाही; नियम तेच आहेत, फक्त खेळाडू व्हीलचेअरवर बसून सर्व ॲक्टिव्हिटी करतात, अशी माहिती महाराष्ट्र व्हीलचेअर असोसिएशन टीमचे मॅनेजर क्षितिज भावसार यांनी दिली.
ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र या तीन संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत आहेत. पीच आणि बाउंड्रीमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले असले तरी खेळाची रंगत आणि नियम पारंपरिक क्रिकेटसारखेच आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी खेळाडू व्हीलचेअरवर बसून करतात, जे पाहणे प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरते.
ही स्पर्धा केवळ क्रिकेटचा अभ्यास नाही तर दिव्यांग खेळाडूंना सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मान्यता मिळवून देणारी एक मोठी संधी मानली जाते, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली आहे.