ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचा आत्मविश्वास; भारताला थेट इशारा

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
zimbabwe-warning-to-india भारत आणि श्रीलंकेने आयोजित केलेल्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात, आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक संघ म्हणजे झिम्बाब्वे. या विश्वचषकात एकही सामना न गमावलेल्या संघांमध्ये झिम्बाब्वेचा समावेश आहे. या विश्वचषकात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या बलाढ्य संघांना हरवले आहे. या प्रभावी कामगिरीमुळे झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा आत्मविश्वास वाढला आहे. सुपर एट टप्प्यात झिम्बाब्वेचा सामना गतविजेता भारत, दोन वेळा विजेता वेस्ट इंडिज आणि २०२४ च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होईल. या सामन्यांपूर्वी, त्यांचे प्रशिक्षक डोयेन इब्राहिम यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
 
zimbabwe-warning-to-india
 
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, झिम्बाब्वेचे सहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी सुपर-८मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाच्या तयारीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. जागतिक क्रमवारी आणि इतर निकषांनुसार झिम्बाब्वेला या स्पर्धेत ‘अंडरडॉग’ मानले जात असले, तरी त्यात काहीच गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. zimbabwe-warning-to-india “या विश्वचषकात सुरुवातीपासूनच आम्हाला गटात अंडरडॉग समजले जात होते आणि आम्हाला अशाच भूमिकेत खेळायला आवडते,” असे इब्राहिम म्हणाले. त्यांच्या मते, अंडरडॉग असण्याचा एक मोठा फायदा म्हणजे संघावर अतिरिक्त दबाव नसतो. काही दिवसांपूर्वी सिकंदर रझानेही याच मुद्द्यावर भाष्य केले होते. इब्राहिम यांनी सांगितले की, भारतासारख्या यजमान संघावर अपेक्षांचा ताण अधिक असतो, कारण ते आपल्या परिचित परिस्थितीत खेळत असतात. “आम्ही मात्र दबावमुक्त होऊन मैदानात उतरतो. या फॉरमॅटमध्ये आमचा संघ सातत्याने सुधारत आहे आणि अधिक बळकट होत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भारतीय प्रेक्षकांच्या उत्साही वातावरणात खेळताना घाबरू नये, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कसोटी असेल, असे इब्राहिम म्हणाले. “भारतीय संघ लयीत असेल, हे गृहित धरूनच आम्ही तयारी केली आहे. zimbabwe-warning-to-india मात्र आम्ही या प्रसंगाने किंवा प्रेक्षकांच्या दडपणाने विचलित होऊ नये, याकडे आमचे लक्ष आहे. नियोजन आणि तयारीच्या बाबतीत आम्ही आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विश्वचषकातील झिम्बाब्वेच्या कामगिरीकडे पाहिले तर गट टप्प्यात त्यांनी चार सामने खेळले, त्यापैकी तीनमध्ये विजय मिळवला, तर आयर्लंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत करत त्यांनी मोठा धक्का दिला होता. त्यानंतर गटातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेवर सहा विकेट्सनी मात करत त्यांनी सुपर-८मध्ये दमदार प्रवेश केला.