नागपूरमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्या?

21 Feb 2026 11:12:50
नागपूर,
12th question papers leaked in Nagpur नागपूरमध्ये बारावीच्या विज्ञान शाखेतील दोन महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेला सुरुवात होण्याच्या सुमारे तासाभर आधी विद्यार्थ्यांच्या एका संदेशगटावर प्रसारित झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकाराबाबत पोलिसांना आधीच गुप्त माहिती मिळाली होती. काही जणांनी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संदेशगट तयार करून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याचा प्रकार सुरू केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी रसायनशास्त्राचा पेपर असताना सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली आढळून आल्या. एका विद्यार्थिनीने वारंवार प्रसाधनगृहात जाण्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकांना शंका आली. शिक्षिकेमार्फत तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्याकडील दूरध्वनी संच जप्त करण्यात आला.
 
 
frica
त्या संचाची तपासणी केल्यावर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका एका संदेशगटावर पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. केंद्रप्रमुखांनी तातडीने पोलिसांना कळवले. पुढील चौकशीत पंधरा विद्यार्थ्यांचा एक गट तयार करण्यात आल्याचे उघड झाले. संबंधित दोन विद्यार्थिनींची चौकशी केली असता खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने पैसे घेऊन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत असल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
Powered By Sangraha 9.0