या चिमण्यांनो, परत फिरा रे!

21 Feb 2026 06:30:00
enter hinduism गोव्याची भूमी ही केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नाही, तर तिच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या पराक्रमाच्या आणि संघर्षाच्या इतिहासासाठीही ओळखली जाते. याच पृष्ठभूमीवर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गोव्यातील पणजी येथील 30 वाडी परिसरात देव गोवेश्वर महाशिव मंदिरात भव्य धार्मिक सोहळा पार पडला; ज्याने केवळ गोव्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात सुमारे 500 बांधवांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. या कार्यक्रमास जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. आखाडा परिषदेतील प्रमुख साधुसंत आणि महंतांच्या साक्षीने वेदपठन, हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले. सुमारे 300 बांधवांनी औपचारिकरीत्या ‘घरवापसी’ केली, तर इतर 200 जणांनीही हिंदू धर्म स्वीकारत एकूण संख्या 500 वर पोहोचली. वाचकहो, हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो होता आपल्या विखुरलेल्या बांधवांना पुन्हा एकदा मायेच्या सावलीत घेण्याचा एक भावनिक आणि आध्यात्मिक प्रयत्न.
 

hindunisum  
 
 
हिंदू धर्माचा इतिहास हा सहिष्णुतेचा इतिहास आहे. मात्र, याच सहिष्णुतेचा फायदा घेत अनेक आक्रमकांनी आणि परकीय शक्तींनी या धर्मावर आघात केले. पण आपण सहिष्णू असलो, तरी पराक्रमात कधीही मागे नव्हतो. आपण या परकीय आक्रमकांचा सामना केला. गोव्याचा इतिहास तर अशा अनेक जखमांनी भरलेला आहे. पोर्तुगीज राजवटीत झालेल्या छळाच्या कथा ऐकल्या तर आजही अंगावर काटा येतो. आजही अनेक ठिकाणी कपटाने, प्रलोभने दाखवून किंवा गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन हिंदू बांधवांचे धर्मांतर केले जाते. मिशनèयांच्या जाळ्यात अडकून, आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीपासून दूर गेलेली ही माणसे प्रत्यक्षात आपल्या मुळांपासून तुटलेली असतात. नरेंद्र महाराजांनी या वास्तवावर नेमके बोट ठेवले आहे. जे बांधव बळजबरीने, कपटाने, लालूच देऊन किंवा काही कारणास्तव त्रस्त होऊन आपला धर्म सोडून गेले, त्यांना पुन्हा सन्मानाने आपल्या धर्मात स्थान देणे, हे आपले कर्तव्य आहे. घरवापसी म्हणजे केवळ धर्मांतर नव्हे, तर ती आहे आपल्या रक्ताच्या नात्याची पुनर्भेट. ज्याप्रमाणे एखादे पाखरू संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परतते, तशीच ही माणसे आज आपल्या मूळ संस्कृतीकडे परतत आहेत.
 
हिंदू धर्म हा केवळ एक उपासना पद्धती नसून ती एक व्यापक जीवन पद्धती आहे. हा धर्म म्हणजे फळे आणि फुलांनी बहरलेला एक विशाल वृक्ष आहे. या वृक्षाची मुळे हजारो वर्षे खोलवर रुजलेली आहेत. या वृक्षाच्या शीतल सावलीत बसण्याचा अधिकार जगातील प्रत्येक मानवाला आहे. या वृक्षाची फळे चाखण्याचा आणि त्याच्या फुलांचा सुवास घेण्याचा अधिकार कोणा एका विशिष्ट वर्गाचा किंवा जातीचा नाही, तर तो संपूर्ण मानवजातीचा आहे. अनेक आक्रमक आले, त्यांनी या वृक्षाच्या फांद्या तोडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मुळावर घाव घातले, पण हा वृक्ष आजही ताठ मानेने उभा आहे. जगातील अनेक प्राचीन संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस यांसारख्या महान संस्कृती आज केवळ इतिहासाच्या पुस्तकात उरल्या आहेत. मात्र, हिंदू धर्म आणि त्याची संस्कृती आजही जिवंत आहे, प्रवाही आहे. हेच आमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हा धर्म ‘सनातन’ आहे. कारण तो शाश्वत सत्यावर आधारित आहे. त्याचबरोबर इथे सुधारणाही सहज होत आहेत. आजच्या आधुनिक जगात केवळ अध्यात्म सांगून चालणार नाही, तर आपल्याला वास्तवाचे भानही ठेवावे लागणार आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहतो, तो म्हणजे ‘संख्याशास्त्र.’ लोकशाहीच्या युगात संख्याबळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर हिंदूंची संख्या घटत गेली, तर आपली संस्कृती, आपली मंदिरे आणि आपली जीवन पद्धती धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच धर्मांतर रोखणे आणि गेलेल्यांना परत आणणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आपण आपली पाळेमुळे जपली असली, तरी आपल्याला यापुढे अत्यंत सावध राहावे लागणार आहे. शत्रू केवळ तलवारी घेऊन धावत येत नाही, तर तो कधी विचारांच्या रूपात, कधी मदतीच्या रूपात तर कधी प्रलोभनांच्या रूपात आपल्या घरात शिरतो. आपल्या बांधवांना आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. जर आपण आपल्या बांधवांची काळजी घेतली, तर त्यांना बाहेर कोणाकडे मदतीसाठी हात पसरण्याची गरज पडणार नाही.
 
जगात आज सर्वत्र अशांतता पसरलेली आहे. युद्धे, दहशतवाद आणि द्वेषाच्या वातावरणात जग होरपळून निघत आहे. अशा वेळी जगाला शांततेचा मार्ग केवळ हिंदू धर्मच दाखवू शकतो. याचे कारण म्हणजे हिंदू धर्माची मूळ वृत्ती. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजे संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे, ही भावना केवळ हिंदू धर्मातच आढळते. आपण केवळ स्वतःच्या कल्याणाचा विचार करत नाही, तर आपण ‘पसायदान’ मागतो. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, ‘जे खळांची व्यंकटी सांडों । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।’ म्हणजे दुष्टांची बुद्धी पालटो आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होवो. ही उदात्त भावना, ही विश्वकल्याणाची प्रार्थना केवळ एका हिंदूच्याच अंतःकरणातून येऊ शकते. त्यामुळेच जगात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर हिंदू धर्माचे विचार प्रबळ होणे आवश्यक आहे. जे बांधव काही कारणास्तव अहिंदू झाले आहेत, ज्यांचे पूर्वज हिंदू होते, पण आज ते आपल्या संस्कृतीपासून दुरावले आहेत, त्यांना आमचे कळकळीचे आवाहन आहे- आपल्या घरी परत या. हिंदू धर्म हा कोणावरही सक्ती करत नाही, तो कोणाचा द्वेष करत नाही. हा धर्म तुम्हाला स्वीकारण्यासाठी, तुम्हाला प्रेम देण्यासाठी सदैव सज्ज आहे. नरेंद्र महाराजांनी आतापर्यंत अनेकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे. हा आकडा केवळ संख्या दर्शवत नाही, तर तो दर्शवतो त्या लोकांचा आपल्या मूळ संस्कृतीवर असलेला विश्वास. गोव्यातील त्या 500 लोकांच्या डोळ्यांतील समाधान हे सांगत होते की, त्यांना त्यांचे हरवलेले घर सापडले आहे. वैदिक मंत्रांच्या घोषात, अग्नीच्या साक्षीने जेव्हा त्यांनी पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा घेतली, तेव्हा तो क्षण केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण हिंदू समाजासाठी अभिमानाचा होता.
 
धर्मांतराचे संकट हे केवळ धार्मिक संकट नाही, तर ते सामाजिक आणि राष्ट्रीय संकटही आहे. जेव्हा एखादा हिंदू बांधव आपला धर्म सोडतो, तेव्हा तो केवळ आपली पूजा पद्धती बदलत नाही, तर तो आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीपासून, आपल्या पूर्वजांच्या परंपरांपासून आणि आपल्या राष्ट्राच्या अस्मितेपासून दुरावतो. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, धर्मांतर हे बहुधा अज्ञानातून किंवा गरजेपोटी केले जाते. जर आपण आपल्या बांधवांना योग्य शिक्षण दिले, त्यांना आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व पटवून दिले आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो, तर कोणीही त्यांना आपल्यापासून तोडू शकणार नाही. गोव्यातील या सोहळ्याने हे सिद्ध केले आहे की, जर आपण प्रेमाने आणि सन्मानाने साद घातली, तर गेलेले बांधव नक्कीच परत येतात. हिंदू धर्म हा कधीही संकुचित नव्हता. ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:’ म्हणजे सर्व दिशांनी आम्हाला शुभ विचार प्राप्त होवोत, ही आमची प्रार्थना आहे. आपण जगाला ‘योग’ दिला, ‘आयुर्वेद’ दिला आणि ‘अध्यात्म’ दिले.enter hinduism जगाला शांतीचा संदेश देणारा हा धर्म आज स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे, हे दुर्दैव आहे. गोव्यातील त्या 500 लोकांनी जेव्हा पुन्हा एकदा कपाळावर टिळा लावला आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष केला, तेव्हा तो केवळ एक आवाज नव्हता, तर तो होता आपल्या स्वाभिमानाचा हुंकार. हा हुंकार साèया जगाला सांगत आहे की, हिंदू धर्म हा कधीही संपणारा नाही. तो त्या अक्षय वटासारखा आहे, जो प्रत्येक संकटातून अधिक जोमाने उभा राहतो. गोव्यातील हा घरवापसीचा सोहळा म्हणजे एका नवीन पहाटेची सुरुवात आहे. हा सोहळा आपल्याला शिकवतो की, जर आपण संघटित झालो आणि आपल्या बांधवांना प्रेमाने जवळ केले, तर कोणतीही शक्ती आपल्याला आपल्या मुळांपासून तोडू शकणार नाही. हिंदू धर्म हा त्या विशाल महासागरासारखा आहे, ज्यात अनेक नद्या येऊन मिळतात. या महासागराची खोली आणि त्याचे गांभीर्य समजून घेण्याची आज गरज आहे. या हिंदू धर्मावर तुमचाही अधिकार आहे बंधू आणि भगिनींनो... हा रुसवा सोडा आणि या विशाल वृक्षाच्या आश्रयाला या... या चिमण्यांनो, परत फिरा रे...
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Powered By Sangraha 9.0