विश्वचषकातून माघारीने बांगलादेशी खेळाडू कोमात!

21 Feb 2026 12:52:46
ढाका,
Bangladeshi player in coma २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बांगलादेश संघाने माघार घेतल्यानंतर देशात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात पुरेशी सुरक्षा मिळणार नाही, या कारणावरून सरकारने संघाला स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी नाकारली. या निर्णयानंतर संघाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माजी क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यावर थेट आरोप केले आहेत.सलाहुद्दीन यांनी सांगितले की या निर्णयामुळे तरुण खेळाडूंची अनेक वर्षांची स्वप्ने एका क्षणात तुटली. विश्वचषकात खेळण्याची संधी ही प्रत्येक खेळाडूसाठी आयुष्यभर जपलेले स्वप्न असते, असे नमूद करत त्यांनी काही खेळाडू गंभीर मानसिक तणावात गेल्याचा दावा केला. राष्ट्रीय हितासाठी त्याग करावा लागला तर खेळाडू तयार असतात, मात्र त्यांच्या वैयक्तिक भावनांचा विचारही झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 

bangladeshi 
दरम्यान, या निर्णयाबाबत आसिफ नजरुल यांनी केलेल्या विधानांमध्ये विसंगती असल्याचे सांगत वाद अधिकच चिघळला आहे. सुरुवातीला भारतात सामने न खेळण्याचा निर्णय सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले, तर नंतर हा निर्णय बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंशी चर्चा करून घेतल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देताना सलाहुद्दीन यांनी हा निर्णय सरकारकडून लादण्यात आल्याचे ठामपणे सांगितले आणि त्यात खेळाडू किंवा प्रशिक्षकांचा कोणताही सहभाग नसल्याचे नमूद केले. खेळाडूंना स्पर्धेतून दूर राहण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यातून संघात निराशेचे वातावरण निर्माण झाले, असा आरोप त्यांनी केला. काही खेळाडू आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व दोष संघावर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या घडामोडींमुळे बांगलादेशच्या क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0