दादा भुसेंचा राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा आणि वादाला पूर्णविराम!

21 Feb 2026 12:04:23
मुंबई,
Bhuse files defamation claim against Raut राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला अखेर मागे घेतला असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही नेते एकाच वेळी न्यायालयात दाखल झाले आणि परस्परांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत शेजारी बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी हा वाद आता संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. न्यायालयात भुसे त्यांच्या शेजारी बसले होते आणि दोघांमध्ये कोणताही तणाव नव्हता, असे त्यांनी सांगितले. हा संपूर्ण वाद चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे नमूद करत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही व्यक्तींवर टीका केली. शेतकरी आणि नागरिकांची माफी मागितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
bhuse
 
 
दुसरीकडे, भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत झालेल्या आरोपांचा उल्लेख केला. मोठ्या रकमेच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप समाजमाध्यमांद्वारे करण्यात आला होता. त्यामुळे मालेगावमधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, असे त्यांनी सांगितले. कारखाना उभा करण्यासाठी मर्यादित निधी गोळा करण्यात आला होता आणि आरोप निराधार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. राऊत यांनी माफी मागितल्याने आणि गैरसमज दूर झाल्याने खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप झाले होते. राऊत यांनी समाजमाध्यमावर भुसे यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप करत मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर भुसे यांनी न्यायालयाची दारं ठोठावली होती. मात्र आता दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याचे चित्र दिसत असून खटला मागे घेतल्याने या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0