छोटा गोंदियातील मामा तलावाची दुर्दशा

21 Feb 2026 18:46:29
गोंदिया,
Chhota Gondia Mama Talav pollution येथील नगर परिषद हद्दीतील छोटा गोंदिया परिसरातील मामा तलाव आज अक्षरशः प्रदूषणाच्या विळख्यात अडकला असून, स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढवले आहे. एकेकाळी पिण्यायोग्य व उपयुक्त असलेला हा तलाव सध्या शेवाळ, जलपर्णी आणि साचलेल्या कचर्‍याने पूर्णपणे झाकला गेला आहे.
 

 Chhota Gondia Mama Talav pollution 
तीनचार दशकापूर्वी परिसरातील नागरिक पिण्यासह घरगुती वापरासाठी या तलावाच्या पाण्यावर अवलंबून होते. मात्र वाढती लोकसंख्या, अनियंत्रित अतिक्रमणे, सांडपाण्याची गळती आणि देखभालीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे तलावाचे रूपांतर दूषित व दुर्गंधीयुक्त जलसाठ्यात झाले आहे. तलावातून उठणारी तीव्र दुर्गंधी इतकी असह्य असते की परिसरात थांबणेही कठीण होते, जलपर्णीच्या वाढीमुळे पाण्याचा प्रवाह थांबला असून, तलाव अक्षरशः सडत चालला आहे. दूषित पाणी व साचलेल्या कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, मलेरिया, डेंगीसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाकडून कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी नगर परिषद तसेच जिल्हा परिषद यांच्याकडे अनेकदा लेखी निवेदने दिली. निवेदनातून स्वच्छता, गाळ काढणे, सौंदर्यीकरण व कुंपण उभारणी आदी मागण्या करण्यात आल्या. मात्र कागदोपत्री आश्वासने सोडली तर प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. निवेदनांचा ढीग वाढत असताना तलावातील कचर्‍याचाही ढीग वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तलावातील जलपर्णी व शेवाळ हटवणे, साचलेला गाळ काढणे, सांडपाण्याचा प्रवाह थांबवणे, नियमित स्वच्छता व देखभाल यंत्रणा उभारणे, तलावाचे सुशोभीकरण व परिसर संरक्षित करावा, अन्यथा, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. एकेकाळचा जीवनदायी मामा तलाव वाचवायचा की तोच प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी ठरू द्यायचा, याचा निर्णय आता संबंधित यंत्रणांनी तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
जबाबदारीची ढकलाढकली; नागरिक त्रस्त
तलावाच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत नगर परिषद व जिल्हा परिषद यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवतो. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर मौन बाळगत असल्याने नाराजी अधिकच वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0