गोरेगाव-हिरापूर रेल्वे फाटकावर रोड ओव्हर ब्रिज

21 Feb 2026 19:31:18
गोंदिया,
Goregaon-Hirapur level crossing गोरेगाव-हिरापूर मार्गावरील गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील जीसीएफ-12 मानव संचालित रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज उभारण्यास प्रशासनिक मंजुरी मिळाली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी व प्रतीक्षेच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.
 

Goregaon-Hirapur level crossing 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया तसेच नगर पंचायत, गोरेगाव यांनी अनापत्ती प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हिरडामाली रेलखंडातील या फाटकावर जून 2024 मध्ये झालेल्या ट्रॅफिक व्हेईकल युनिट सर्वेक्षणानुसार दररोज सुमारे 17 हजार 9 वाहनांची ये-जा होते. सततच्या रेल्वे वाहतुकीमुळे फाटक बराच वेळ बंद राहतो आणि वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. फ्लायओव्हर उभारल्यानंतर स्थानिक नागरिकांसह आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नगर पंचायत, गोरेगाव यांनी दिलेल्या अनापत्ती प्रमाणपत्रात काही अटी नमूद करण्यात आल्या आहेत. प्रस्तावित कामामुळे परिसरातील नागरिकांच्या सुविधांवर प्रतिकूल परिणाम होता कामा नये. अनापत्ती प्रमाणपत्र हे केवळ मंजूर ठिकाण, गट क्रमांक व भूखंड क्रमांकापुरतेच वैध राहील. योजनेत कोणताही बदल झाल्यास अनापत्ती आपोआप रद्द मानली जाईल. तसेच आवश्यक परवानग्या व नोंदणी नगर पंचायत कार्यालयात करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 मधील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असेल. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी संबंधित विभागांना अनापत्ती प्रमाणपत्र तातडीने सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.

टप्प्याटप्प्याने लेव्हल क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय
वाढती वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे बोर्डाच्या धोरणानुसार टप्प्याटप्प्याने सर्व लेव्हल क्रॉसिंग बंद करून त्यांच्या ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज किंवा अंडरब्रिज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने 22 जानेवारी 2025 रोजी रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाकडे फाटक बंद करण्याबाबत परवानगी मागितली होती. त्यानंतर संबंधित विभागांकडून अनापत्ती प्रमाणपत्र मागविण्यात आले. 9 फेब्रुवारी 2026 रोजी नगर पंचायत, गोरेगाव यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले की, प्रस्तावित रोड ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाल्यानंतर मानव संचालित रेल्वे फाटक बंद करण्यास त्यांची कोणतीही हरकत नाही.या प्रकल्पामुळे गोरेगाव शहराच्या वाहतुकीला नवी दिशा मिळणार असून नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे.
...
Powered By Sangraha 9.0