गादीत सापडला तरुणीचा मृतदेह...प्रेमविवाहाच्या वादातून आईकडून हत्या

21 Feb 2026 11:30:45
छ.संभाजीनगर,
Murder by mother over love marriage dispute छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज महानगर परिसरात गादीत गुंडाळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा थरारक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात आईनेच लेकीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिसगाव चौफुली परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला. वडगाव कोल्हाटी येथील कुटुंब गावी जात असल्याचे सांगत घरातील साहित्य रिक्षेतून नेत होते. सामानात एक मोठी गादी दोरीने घट्ट बांधलेली होती. रिक्षाचालकाला त्या गादीबाबत संशय आल्याने त्याने तातडीने आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी चौकशी केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गादी उघडून पाहिली असता त्यामध्ये सुमारे वीस वर्षांची तरुणी मृत अवस्थेत आढळली. तिची ओळख नंदिनी राजू धिवरे अशी पटली.
 
 
 
Murder by mother
प्राथमिक चौकशीत आईने मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला; मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात प्रेमसंबंधांच्या वादातून हा गुन्हा घडल्याचे समोर आले. संबंधित तरुणीचे कन्नड येथील एका युवकासोबत संबंध होते आणि ती विवाहासाठी आग्रही होती. याला आईचा विरोध होता. घरात गेल्या काही दिवसांपासून यावरून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आई भारती उमेश साबळे हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मृतदेह गादीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0